नेवासा -
काही माणसं जशी स्वकष्टातून उभी राहिलेली असतात तशीच काही गाव ही एखाद्याचं प्रेरणादायी नेतृत्व मान्य करीत, त्याला पाठिंबा देत कष्ट उपसतात आणि या सगळ्यांच्या  एकत्रित प्रयत्नातून उभं राहतं एक आदर्श गाव. अशाच कष्टातून उभ्या राहिलेल्या आणि विकासाच्या उर्जेने स्वंयप्रकाशित झालेल्या अहमदनगर जिल्ह्यातील हिवरेबाजार व राळेगण सिद्धी या दोन आदर्श गावांना यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व मुळा एज्युकेशन सोसायटीच्या यश संवाद टीमने भेट दिली. यशवंत सामाजिक प्रतिष्ठान व मुळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रशांत गडाख यांच्या ‘ग्रामविकास’ या संकल्पनेतून या भेटीचे नियोजन यश संवाद अभियानचे समन्वयक प्रा.देविदास साळुंके यांनी केले होते. या टीममध्ये प्रा.सोमेश चव्हाण, प्रा.भारत शिंदे, एकनाथ बोर्डे, सागर शिंदे, शाम वैरागर, दामोधर पवार व प्रा.देविदास साळुंके यांचा समावेश होता.
या वेळी यश संवाद टीमने हिवरेबाजार व राळेगण सिद्धी येथील विकास कामांची पाहणी केली. हिवरेबाजार येथे महाराष्ट्र राज्याच्या आदर्श गाव योजना समितीचे कार्याध्यक्ष व  सरपंच पोपटराव पवार आणि राळेगण सिद्धी येथे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे  यांच्याशी यश संवाद टीमने ग्रामविकासावर संवाद साधला. यशवंत सामाजिक प्रतिष्ठानतर्फे दोघांना झाड व पुस्तके भेट देण्यात आली. यश संवाद अभियानांतर्गत ‘ग्रामविकासातून राष्ट्रविकास’ या विषयावर श्री ज्ञानेश्वर महाविद्यालय नेवासा येथे पुढील महिन्यात आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यानाचे निमंत्रण पोपटराव पवार यांनी स्वीकारले.