October 2019
पुणे – विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी नागरिकांनी रविवारची खरेदीची कसर भरून काढली. त्यामुळे सोमवारी साप्ताहिक सुटी असूनही व्यापाऱ्यांनी दुकाने उघडली. रविवार पेठ, तुळशीबाग, लक्ष्मीरस्ता, मंडई परिसरात अक्षरश: खरेदीची झुंबड उडाली.

दिवाळी चार पाच दिवसांवरच येऊन ठेपली आहे. त्याआधीचा रविवार म्हणजे 20 ऑक्‍टोबरचा रविवार लोकांनी दिवाळी खरेदीसाठी ठेवला होता. मात्र, रविवारी सकाळी दहा वाजल्यापासून अक्षरश: पावसाने संततधार हजेरी लावल्याने बाजारपेठांमध्ये अक्षरश: शुकशुकाट होता. मात्र सोमवारी बहुतांश कंपन्या आणि सरकारी आस्थापनांना विधानसभा निवडणुकीच्या मतदानानिमित्त प्रोत्साहनपर सुटी दिल्याने हा अनेकांसाठी खरेदीचा दिवस ठरला. सकाळी मतदान करून अनेकजण खरेदी करण्यासाठी बाहेर पडले.

सकाळपासूनच ढग दाटून आले होते मात्र पाऊस नव्हता. सायंकाळी चार-पाच नंतर जोरात पाऊस येणार अशी शक्‍यता वाटल्याने सकाळीच बाजारपेठांमध्ये खरेदीसाठी गर्दी झाली होती.

मुंबई: मुंबईतील विशेष कोर्टाने पीएमसी बॅंक घोटाळ्यातील आरोपी राकेश वाधवन आणि सारंग वाधवन यांच्या अंमलबजावणी संचालनालयाची कोठडी २४ ऑक्टोबरपर्यंत वाढविली आहे.
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बॅंकेच्या निर्बंधाने आणखी एक बळी घेतला. सोलापुरात राहणाऱ्या ७३ वर्षीय महिलेचा आज जीव गेला. या बॅंकेत खाते असणाऱ्या मुलीशी बोलल्यानंतर भारती सदारंगानी यंचा रविवारी दुपारी हृदयविकाराने मृत्यू झाला. आतापर्यंत ५ खातेदारांच्या मृत्यू झाला आहे.

या बॅंकेच्या खातेदारांना आता 40 हजार रूपयांपर्यंतची रक्कम खात्यातून काढण्याची अनुमती प्रशासकाने दिली आहे. तथापी अद्यापहीं अनेक खातेदारांचे कोट्यवधी रूपये या बॅंकेत अडकून पडले आहेत.

नगर – मतदान प्रक्रीया शांततेत पार पाडण्यासाठी जिल्ह्यात 12 विधानसभा मतदार संघात 3 हजार 722 मतदान केंद्र उभारण्यात आले होते. कर्जत-जामखेड वगळता इतर मतदान केंद्रात शांततेत मतदान झाले. प्रत्येक मतदान केंद्रावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जिल्ह्यात पोलीस प्रशासनाकडून सात हजार पोलीसांचा बंदोबस्त होता. प्रत्येक विधानसभा मतदार संघात शांततेत मतदान प्रक्रीया पारपडावी यासाठी पोलीस प्रशासनाकडून सीमा सुरक्षा दल, रेल्वे सुरक्षा दल, एसआरपीएफ होमगार्ड असा एकून सात हजार 72 जणांचा फौज फाटा तैनात करण्यात आला होता.

राज्यात विधानसभा निवडणूकीचे मतदान सर्वत्र 21 ऑक्‍टोबर ला एकाच दिवशी पार पडत असल्याने प्रत्येक जिल्हात बंदोबस्तासाठी मोठा फौजफाटा लागणार असल्याचे नियोजन पोलीस प्रशासनाने केले होते. अशा परिस्थितीत दुसऱ्या जिल्हातून पोलीस बंदोबस्त मिळणार नसल्याने जिल्हासह, केंद्रीय सशस्त्र दल व होमगार्डवर निवडणूक बंदोबस्ताची जबाबदारी असणार आहे. जिल्हाचा विस्तार मोठा असल्याने जिल्ह्यात अनेक मतदार संघात काही संवेदनशील मतदान केंद्रावर जास्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नेवासे – पावसाचे वातावरण असतानाही त्यांची परवान न करता नेवासे तालुक्‍यात मतदारांनी मतदानाला उस्फूर्त उत्साहात मतदान केले. मतदान केंद्रावर सकाळपासूनच मतदारांनी गर्दी केल्याने केंद्रावर रांगा लागल्या होत्या.
तालुक्‍यात सकाळपासून भेंडे येथील मतदान केंद्रावर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. मतदान यंत्र सुरू होण्यास विलंब झाल्याने केंद्रांवर दोन दोन तास ताटकळत बसावे लागले. यावेळी मात्र मशीन बंद चालूचा अनुभव मतदारांना आला नाही. अपंग मतदारांना व्हील चेअर नसल्याने तसेच अनेक सुविधाचा अभाव असल्याने निवडणूक आयोगाचा सावळा गोंधळ यानिमित्ताने समोर आला. तालुक्‍यात मतदान केंद्रावर किरकोळ प्रकार वगळता शांततेत मतदान झाले. तालुक्‍यात दोन लाख 62 हजार 137 मतदार असून दुपारी 3 वाजेपर्यंत 57 टक्के मतदान झाले होते.

आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी कुटूंबियांसह देवगाव या आपल्या गावी मतदानाचा हक्क बजावला. माजी आमदार शंकरराव गडाख यांनी सोनई गावात मतदानाचा हक्क वाजवला तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व जिल्हा परिषद सदस्य तेजस्वी लंघे यांनी शिरसगाव या गावी मतदानाचा हक्क बजावला.तालुक्‍यातील अनेक गावांमध्ये रिमझिम पावऊ सुरू होता. असे असतांना मतदानासाठी नागरिक येत होते. दुपारनंतर मतदान केंद्रांवर गर्दी केली होती. नवमतदारांनीही मोठ्या उत्साहात मतदान केंद्रांवर हजेरी लावल्याचे दिसत होते. विशेषतः महिला वर्ग मतदानासाठी मोठ्या प्रमाणात बाहेर पडला होता.

संगमनेर – भाजप व शिवसेनेने मागील पंधरा दिवसांमध्ये 220 जागा यावर बोलण्याचे सोडले असून, त्यांना पराभव दिसत आहे. या निवडणुकीमध्ये जनता त्यांच्या भूलथापांना कंटाळली असल्याने यावेळेस कॉंग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेवर येणार आहे. मुख्यमंत्री आघाडीचाच होईल, असा ठाम विश्‍वास कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

जोर्वे येथे मतदान केल्यानंतर ते माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. आमदार थोरात म्हणाले, सरकारने मागील पाच वर्षांत पूर्णत: भ्रमनिरास केला आहे. सत्ताधाऱ्यांच्या भावनिक मुद्‌द्‌यांना यावेळेस जनता बळी पडणार नसल्याने त्यांचा पराभव अटळ आहे. राज्यातील फसलेली कर्जमाफी, बंद पडत चाललेली कारखानदारी, वाढलेली बेरोजगारी यावर न बोलता 370 सारखे भावनिक मुद्दे करून राजकारण करण्याचा भाजपने प्रयत्न केला.

सातारा: सोमवारी राज्यभर विधानसभेसाठी मतदान झाले. काही अपवाद वगळता इतर ठिकाणी मतदान शांततेत पार पडले. सातारा जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीबरोबरच लोकसभा पोटनिवडणुकीचेही मतदान पार पडले. हे मतदान पार पडत असताना खटाव तालुक्यातील नवलेवाडी या मतदारसंघात घड्याळा समोरील बटन दाबल्यानंतर थेट कमळाला मत जात असल्याची माहिती समोर आली होती. परंतु या संपूर्ण प्रकरणात काही तथ्य नसून अशी कुठलीही घटना घडली नसल्याचं स्पष्टीकरण निवडणूक निर्णय अधिकारी किर्ती नलावडे यांनी दिलं आहे.

कोरेगाव मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर हा प्रकार घडला. मॉक ड्रीलवेळी ईव्हीएम चांगले होते. मात्र, सकाळी 10-11 वाजण्याच्या सुमारास ईव्हीएममध्ये घडाळ्याचे बटन दाबले असता कमळाला मत जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र, यामागची माहिती जाणून घेतली असता खरे सत्य समोर आले.

सकाळी 10 च्या सुमारास या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड आला. यामुळे मतदान करताना एरर दाखवू लागले. वरचे किंवा खालच्या बाजुचे कुठलेही बटन दाबले जात असता ते दाबलेच जात नव्हते. याबाबतची तक्रार जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे करण्यात आली. या प्रकाराची माहिती राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना लागली. ईव्हीएममध्ये बिघाड की कमळाला मतदान होते याची चाचपणीही त्यांनी केली आणि त्यांनतर खरा प्रकार समोर आला आहे.
मुज्फरनगर: उत्तरप्रदेशातील सरकारने वीज बिल थकवणाऱ्या शेतकऱ्यांच्या विरोधात पोलिसांत गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या प्रकरणी भारतीय किसान युनियने तीव्र संताप व्यक्त केला आहे. हा शेतकऱ्यावरील अन्याय असून आम्ही असा अन्याय सहन करणार नाही असा इशारा या संघटनेचे अध्यक्ष नरेश टिकैत यांनी दिला आहे. त्यांनी नमूद केले की उस उत्पादक शेतकऱ्यांना त्यांची उसाची बिले अजून मिळालेली नाहीत. आणि ती मिळायच्या आधीच सरकारने वीज बिल भरले नाही म्हणून शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

उत्तरप्रदेशातील हजारो शेतकऱ्यांच्या उस बिलाचे पैसे कारखान्यांकडे थकलेले आहेत. ते पैसे त्वरीत देण्याचा आदेश अलाहाबाद उच्च न्यायालयाने देऊनही ही बिले अजून अदा झालेली नसताना सरकारने शेतकऱ्यांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल करणे हा अघोरी अन्याय आहे असेहीं टिकैत यांनी म्हटले आहे.
मुंबई : राज्यात यावर्षीचा दक्षता जनजागृती सप्ताह दि. 28 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2019 या कालावधीत ‘ईमानदारी- एक जीवनशैली’(इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ) या संकल्पनेवर आधारित आयोजित करण्यात येणार आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध जागृती निर्माण करण्यासाठी राज्यात सन 2000 पासून दरवर्षी दक्षता जनजागृती सप्ताह आयोजित केला जातो. भ्रष्टाचार निर्मुलन, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा तसेच भ्रष्टाचाराचे गंभीर परिणाम आणि धोके याविषयी परिणामकारक जनजागृतीचे माध्यम म्हणून केंद्रीय दक्षता आयोग (सीव्हीसी) जनजागृती सप्ताहाकडे विशेष लक्ष केंद्रित करते. यावर्षी आयोगाने ‘इंटेग्रिटी- अ वे ऑफ लाईफ’ या संकल्पनेनुसार जनजागृतीवर भर देण्याचे निश्चित केले आहे.

राज्य शासनाचे सर्व विभाग व त्यांच्या नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख, कार्यालय प्रमुख, राज्य शासनाचे अंगीकृत उपक्रम, सहकारी संस्था व स्वायत्त संस्थांमार्फत सप्ताहाचे आयोजन करण्यात येणार आहे. दिनांक 30 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वा. भ्रष्टाचार निर्मुलनाची शपथ घेऊन कार्यक्रमाचा प्रारंभ होईल. त्यानंतर राज्यपालांचा संदेश उपस्थितांना वाचून दाखविण्यात येणार असून हा संदेश राज्यातील जनतेसाठी प्रसूत करण्यात येईल.

या सप्ताहाच्या निमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार कार्यालयाच्या दर्शनी भागात व मोक्याच्या ठिकाणी भित्तीपत्रक, कापडी फलक लावण्यात येणार आहेत. कार्यालये, शाळा, महाविद्यालयांमध्ये भ्रष्टाचाराच्या दुष्परिणामांवर प्रकाश टाकण्यासाठी चर्चासत्रे, वादविवाद स्पर्धा, व्याख्याने, निबंधस्पर्धा, कार्यशाळांचे आयोजन करण्यात येणार आहे. यानिमित्ताने विशेष पुस्तिकांचे प्रकाशन करणे तसेच केंद्रीय दक्षता आयोगाच्या http://www.cvc.nic.in या संकेतस्थळावरील जनजागृती साहित्याचे जनतेमध्ये वितरण करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील अशासकीय संघटना, स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी दक्षता जनजागृती मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन सामान्य प्रशासन विभागामार्फत करण्यात आले आहे.

नगर – नेत्याचा पोरगा नेताच व्हायला हवा का? जो लोकांची कामे करतो त्याला नेता केले पाहिजे. तुमच्या भागात मुलाला तिकीट दिले नाही की आधी मुलाला दुसऱ्या पक्षात पाठवले जाते व नंतर बाप असलेला नेताही त्या पक्षात जातो,अशी कोपरखळी सध्याच्या पक्षातंरावर मारत भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा युवा नेता कन्हैयाकुमार याने स्थानिक समस्या सोडविणाऱ्या उमेदवाराला निवडून द्या असे आवाहन केले. कन्हैयाकुमारची सभा आज नगर शहरात झाली.

सभेपूर्वी त्याने पत्रकारांशी संवाद साधला. कन्हैयाकुमार म्हणाला,सावरकर यांना भारतरत्न देणे म्हणजे भगतसिंग यांच्या बलिदानाचा अपमान ठरेल.राज्याच्या प्रश्‍नावर कुणीच बोलत नाही.प्रत्येक प्रश्‍नावर केवळ 370 व राममंदिर हेच मुद्दे का आणले जात असतात. दुसरीकडे कॉंग्रेस व अन्य पर्याय असलेले नेते ईडीच्या भितीने एका रात्रीत गांधीजींचे गुणगाण सोडून नथुराम गोडसे यांची स्तुती करत आहेत.

नगर – जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचा सावळा कारभार डांबर घोटाळ्यामुळे चव्हाट्यावर आल्यानंतर आता हे प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. एका कार्यकारी अभियंत्याने चौकशी करून दिलेला डांबर घोटाळ्याचा अहवाल खोटा ठरविण्याचा प्रयत्न आता दुसरे कार्यकारी अभियंताच करीत आहेत. डांबर खरेदीची चलनेच बदलण्याचा घाट घालण्यात आला आहे. 

यापूर्वी जोडलेल्या झेरॉक्‍स प्रतीच गायब करून त्या ठिकाणी बनावट चलने जोडण्यात येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. दरम्यान, डांबर घोटाळ्याच्या चौकशी अहवालावरून कारवाई करण्याचा निर्णय झाला तर ठेकेदारासह कार्यकारी अभियंत्यापासून ते लिपीकापर्यंत अशा सर्वांना कारवाईला समोरे जावे लागेल. पण हे टाळण्याचा खटाटोप सध्या सुरू आहे.

श्रीरामपूर येथील ठेकेदार जुनेद शेख यांनी गेल्या तीन वर्षांत केलेल्या रस्त्याच्या 33 कामांमधील तब्बल 60 ते 65 लाखांचा डांबर घोटाळा नुकताच उघडकीस आला. जिल्हा परिषदेच्या बांधकाम उत्तर विभागाकडून रस्ते तयार करण्याचे काम शेख यांना देण्यात आले होते. प्रत्येक कामाच्या अंदाजपत्रकातील डांबर वापराच्या तरतुदीनुसार डांबर खरेदी करून ते वापरणे आवश्‍यक आहे. परंतु शेख यांनी प्रत्यक्ष डांबर खरेदी न करता एका कामांसाठी खरेदी केलेले डांबर अन्य कामांना वापरले. विशेष महणजे खरेदी केलेल्या डांबराच्या चलनाची मुळ प्रती बिलाला न जोडता झेरॉक्‍स प्रत जोडली.
अकोले – तालुक्‍यातील संघर्षमय अशी राजकीय निवडणूक आता अंतिम टप्प्यात येऊन पोहोचली आहे. अंतिम टप्प्यामध्ये निवडणूक ही समसमान पातळीवर आल्याने पुढील तीन दिवसांच्या काळामध्ये नेमके कोण कशा पद्धतीने विजयाच्या समीप जाणार हे पाहणे औचित्याचे ठरणार आहे. मात्र हल्ला पिचड पिता-पुत्रांवर आणि रोख मात्र विखे पाटलांवर आहे. त्यामुळे या लढतीला खरेतर पिचड विरुद्ध लहामटे-भांगरे असे जरी सकृतदर्शनी चित्र उभे राहिले असले, तरीही लढतीचे खऱ्या अर्थाने अंतिम टप्प्यातील चित्र म्हणजे पवार विरुद्ध विखे अशी लढत अंतिम टप्प्यात येऊन पोहोचलेली आहे.

पिचड पिता-पुत्रांचे पक्षांतर अनेक कारणांनी गाजले. चाळीस वर्षे शरद पवार यांनी त्यांना लाल दिवा व अन्य पदे दिली. तरीही पिचड यांनी पक्षांतर केले. त्यामुळे त्यांनी केलेले पक्षांतर हे सध्या राजकीय वर्तुळामध्ये आघाडीच्या दृष्टीने टीकेचे केंद्रबिंदू बनले आहे. हे जरी खरे असले तरी हे सर्व राजकीय वातावरण बदलवणारे बडे नेते व विद्यमान मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यामागे आहेत. पण पक्षांतरामागची कारणे अनेक असतील व आहेत. पण 12 विरुद्ध 0 अशी निकालाचे भाकित करणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरळ सरळ आघाडीच्या नेत्यांना शिंगावर घेतले आहे. ते आपली राजकीय भूमिका म्हणून गेले, पण त्यामध्ये पिचड यांचे विजयाचे चक्र हे अधिक क्‍लिष्ट बनत चालले आहे, एवढे मात्र निश्‍चित.
मुंबई : खासगी कार्यालये, आस्थापना, दुकाने, कारखाने व अन्य ठिकाणी काम करणाऱ्या अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना विधानसभा निवडणुकीत मतदान करता यावे यासाठी दि. 21 ऑक्टोबर 2019 रोजी भरपगारी सुट्टी किंवा सवलत देण्यात यावी, असे निर्देश राज्याच्या कामगार आयुक्तांनी दिले आहेत.
राज्य शासनाने याविषयी दिनांक 25 सप्टेंबर रोजी परिपत्रक काढले आहे. त्यानुसार सर्व दुकाने, खासगी कार्यालये, आस्थापना, माहिती तंत्रज्ञान कंपन्या, कारखाने, मॉल्स, व्यापारी संकुल, निवासी हॉटेल, नाट्यगृहे आदी ठिकाणी काम करणारे मतदानादिवशी भरपगारी सुट्टी किंवा सवलतीस पात्र असतील. मतदारसंघातील मतदार असलेले अधिकारी, कर्मचारी कामानिमित्त मतदारसंघाबाहेर कार्यरत असल्यास त्यांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

अपवादात्मक परिस्थितीत पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसल्यास संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीने मतदान क्षेत्रातील कामगारांना सुट्टीऐवजी दोन ते तीन तासांची भरपगारी सवलत देणे आवश्यक राहील. अशी सवलत मिळत नसल्यास तसेच मतदानासाठी सुट्टी दिल्यानंतर त्या दिवशीचे वेतन कपात केल्यास जिल्हा कामगार अधिकाऱ्यांकडे तक्रार नोंदविता येईल.

मुंबईमधील खासगी आस्थापनांतील अधिकारी, कर्मचारी तसेच कामगारांना मतदानासाठी भरपगारी सुट्टी किंवा वेळेची सवलत मिळत नसल्यास त्यांना स्वत:चे नाव, मतदान क्षेत्राचा तपशील, आस्थापनेचे नाव, पत्ता, भ्रमणध्वनी किंवा दूरध्वनी, आस्थापना मालकाचे किंवा व्यवस्थापकाचे नाव आणि त्यांचा भ्रमणध्वनी, दूरध्वनी या तपशीलासह तक्रार करता येईल.

प्रमुख सुविधाकार, बृहन्मुंबई महानगरपालिका (दूरध्वनी क्र. 022-24311751) व त्यांच्या अधिपत्याखालील महानगरपालिकेतील प्रभागनिहाय कार्यालयामध्ये तक्रार नोंदविता येईल. तसेच राज्याचे कामगार आयुक्त यांचे कार्यालय, कामगार भवन, सी-20, ई-ब्लॉक, वांद्रे- कुर्ला संकुल, वांद्रे (पूर्व), मुंबई (दूरध्वनी क्र. 26573733, 26573844) येथे तक्रार नोंदविता येईल, असेही कळविण्यात आले आहे.
मुंबई : राज्यातील विविध जिल्ह्यांतील सुमारे 108 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक; तर विविध ठिकाणच्या रिक्तपदांच्या पोटनिवडणुकांसाठी 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी  दिली.
श्री. मदान यांनी सांगितले की, सार्वत्रिक निवडणुकांमध्ये 14 डिसेंबर 2019 ते 31 मार्च 2020 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 108 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. यासह पोटनिवडणुकांसाठी विधानसभा मतदार संघांच्या 4 ऑक्टोबर 2019 रोजी अस्तित्वात आलेल्या मतदार याद्या ग्राह्य धरण्यात येतील. त्या आधारावर तयार करण्यात येणाऱ्या ग्रामपंचायतींच्या प्रारूप मतदार याद्या 1 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील. त्यावर 5 नोव्हेंबर 2019 पर्यंत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम मतदार याद्या 6 नोव्हेंबर 2019 रोजी प्रसिद्ध केल्या जातील.
मुंबई : राज्यात 62 हजार 366 अंध मतदारांची 23 हजार 101 मतदान केंद्रांवर नोंदणी करण्यात आली आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यात 3 लाख 96 हजार 673 दिव्यांग मतदारांची नोंद करण्यात आली आहे. या दिव्यांग मतदारांमध्ये 38 हजार 763 मूकबधीर, हालचाल करण्यास अक्षम असे व्यंग असलेले 1 लाख 76 हजार 615 आणि अन्य स्वरुपाचे 1 लाख 18 हजार 929 दिव्यांग यांचा समावेश आहे.


राज्यातील 96 हजार 661 मतदान केंद्रांपैकी 65 हजार 483 मतदान केंद्रावर दिव्यांग मतदारांची नोंदणी झाली आहे. त्यात 17 हजार 957 मतदान केंद्रावर मूकबधीर, 42 हजार 905 मतदान केंद्रावर हालचाल करण्यास अक्षम असे दिव्यांग आणि 20 हजार 465 हजार मतदान केंद्रावर अन्य स्वरुपाचे व्यंग असलेल्या मतदारांची नोंद झाली आहे.या सर्व मतदान केंद्रांवर किमान अत्यावश्यक सुविधा पुरविण्यात येतील. मतदान खोलीपर्यंत सुलभतेने जाण्यासाठी रॅम्प, इव्हीएमवर ब्रेल भाषेतील मतपत्रिका, व्हीलचेअरची सुविधा पुरविण्यात येईल. मतदान केंद्रावर दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था असेल. त्यांना मदत करण्यासाठी ‘दिव्यांग मित्र स्वयंसेवक’ असतील. दिव्यांग मतदारांना सुलभ निवडणुकीचा आनंद मिळेल यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.

मुंबई : विधानसभा निवडणुक शांततेत पार पाडण्यासाठी राज्य आणि केंद्राचे पोलीस दल सुसज्ज झाले असून सुमारे तीन लाखाहून अधिक सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. गडचिरोली जिल्ह्यात विशेष सुरक्षा व्यवस्था केली असून तीन हेलिकॉप्टर व ड्रोन तैनात करण्यात आले असल्याची माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक तथा विधानसभा निवडणुकीसाठीचे सुरक्षा विषयक नोडल अधिकारी मिलिंद भारंबे यांनी दिली.
मतदान व मतमोजणीच्या कालावधीत कोणतीही अनुचित घटना घडू नये, शांततेत सर्व प्रक्रिया पार पाडावी, यासाठी राज्य पोलीस दलातील 2 लाख पोलीस अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस दल, नागालँडचे महिला पोलीस दल आदी केंद्रीय सुरक्षा दलाच्या 350 कंपन्या (प्रत्येक कंपनीत शंभर अधिकारी/जवानांचा समावेश), राज्य राखीव पोलीस दलाच्या 100 कंपन्या, राज्य गृहरक्षक दलाचे 45 हजार जवान अहोरात्र तैनात करण्यात आल्या आहेत. याबरोबरच इतर राज्यातील सुमारे 20 हजार गृहरक्षक दलाच्या जवानांचीही मदत घेण्यात आली आहे.
पाथर्डी – मागील पाच वर्षात पंकजाताई यांनी दिलेल्या आमदार मोनिका राजळे यांना निवडुन दिल्यामुळे भरीव कामे मतदारसंघामध्ये झाली. रस्त्यांबरोबरच, जलसंधारणाची कामे या भागामध्ये झाली असुन यापुढे आश्वासन देणाऱ्या उमेदवारांना निवडुन न देता, भाजप आणि पंकजाताई यांनी विश्वास ठेवलेल्या उमेदवारांनाच आपण निवडुन देण्याचे काम करण्याची गरज असल्याचे मत ज्येष्ठ नेते भिमराव फुंदे यांनी टाकळीमानुर येथे प्रचार सभेत व्यक्त केले.

तालुक्‍यातील राजकाराणात पूर्वी मी राष्ट्रवादी पक्षाकडुन पंचायत निवडणुक लढविली असतांना भालगाव आणि टाकळीमानुर गणमध्ये पडलो. त्यावेळी मला कळले की राष्ट्रवादीचे इथे काय आहे, हा भाग भाजप आणि ना. पंकजा मुंडे यांच्या मागे किती खंबीर पणे उभा आहे. समोरचे उमेदवार जाती पातीचे विष या मतदारसंघात पसरवत आहेत.

परंतु त्यांना माझ्यामुळेच जिल्हा परिषद मिळाली असल्याचे त्यांनी विसरुन चालणार नाही, वीस वर्षापासुन राजकारण करीत आहेत. जात दिसली नाही आणि कामेही करता आली नाहीत, पंकजाताई यांच्या नेतृत्व मान्य करणारा समाज कमळ चिन्हापासुन दुर झाले नाही. त्यामुळे जातीचे राजकारण करणाऱ्यांना या भागामध्ये अनेकवेळा धडा शिकवला. देशात भाजपचे सरकार आहे. राज्यातही भाजप सेना युतीचे सरकार येणारा आहे. त्यामुळे पंकजाताई यांनी दिलेला उमेदवार आ. राजळे यांच्यामागे उभे राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

संगमनेर – राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार ऐंशी वर्ष असूनही ते एखाद्या तरूणासारखे राज्यात प्रचारासाठी फिरत आहेत. त्यांना मोठा प्रतिसाद मिळत असल्याने भाजप सरकार घाबरले. त्यामुळे पवारांना ईडीची नोटीस पाठविली. मात्र, ते घाबरले नाहीत. कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या आघाडीला चांगले वातावरण असून आघाडीला राज्यात दिडशेहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला.

संगमनेर शहरातील राष्ट्रवादी कॉंग्रेस कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कपिल पवार, तालुकाध्यक्ष आबासाहेब थोरात, शहराध्यक्ष प्रशांत वामन, सरूनाथ उंबरकर, नगरसेवक किशोर टोकसे, एनएसयुआयचे जिल्हाध्यक्ष निखील पापडेजा, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते किरण घोटेकर उपस्थित होते.

थोरात म्हणाले, कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची व मित्रपक्षांची आघाडी झाल्याने राज्यात चांगले वातावरण आहे. संगमनेर तालुक्‍यातील सहकारी संस्थांमध्ये यापुढे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना संधी देणार असल्याचेही ते म्हणाले.
मुंबई : नेदरलँड्सचे राजे विलेम-अलेक्झांडर आणि राणी मॅक्सिमा यांनी आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी शासनाच्या वतीने राज्यपालांनी शाही दांपत्याचे स्वागत केले.
नेदरलँडमध्ये अनेक भारतीय वंशाचे लोक राहत असून तेथील उद्योग, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात योगदान देत असल्याचे राजे विलेम-अलेक्झांडर यांनी सांगितले. भारतीय योग नेदरलँडमध्ये अतिशय लोकप्रिय असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी कृषी व फलोत्पादन पायाभूत सुविधा, जागतिक पर्यावरणातील बदल, सांस्कृतिक संबंध या विषयांवर चर्चा झाली.

महाराष्ट्र औद्योगिक क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी देशातील सर्वांत पसंतीचे राज्य असल्याचे राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी यावेळी सांगितले.

बैठकीनंतर राज्यपालांनी शाही दांपत्याला राजभवन परिसराची सैर करविली.
मुंबई : मुंबई उपनगर जिल्ह्यातील कलाकारांना व्यासपीठ मिळावे व त्यांच्या कलागुणांना वाव मिळावाए यासाठी मुंबई उपनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने नोव्हेंबर महिन्यात जिल्हास्तरीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
मुंबई उपनगर जिल्ह्यातील सर्व शाळा- कॉलेजमधील इच्छुक कलावंत स्पर्धकांनी जास्तीत जास्त संख्येने या युवा महोत्सवाच्या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ ते २९ वयोगटातील कलाकारांसाठी आहे.

लोकनृत्य, लोकगीत,एकांकिका, शास्त्रीय गायन, शास्त्रीय संगीत, सितार, गिटार, बासरी, तबला, वीणा, मृदुंग, हार्मोनियम, शास्त्रीय नृत्य, मणीपूरी, ओडिसी, भरतनाट्यम, कथ्थक, कुचीपुडी, वक्तृत्व यात सहभागी होणाऱ्या कलावंतांनी 15नोव्हेंबर 2019 पर्यंत आपल्या प्रवेशिका dsomumbaisub@gmail.com या ईमेलवर पाठवाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.

मुंबई - महाराष्ट्र विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. अधिकाधिक मतदान व्हावे, यासाठी मतदार जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत. लोकशाहीच्या या महाउत्सवाच्या तयारीवर एक दृष्टीक्षेप...
एकूण मतदार
· महाराष्ट्रात पुरुष, महिला, तृतीयपंथी, दिव्यांग असे एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार.
· महाराष्ट्रात एकूण 8 कोटी 98 लाख 39 हजार 600 मतदार आहेत.
· यामध्ये पुरुष मतदार - 4 कोटी 68 लाख 75 हजार, 750
· महिला मतदार- 4 कोटी 28 लाख 43 हजार 635,
· तृतीयपंथी मतदार- 2 हजार 634 आहेत.
· दिव्यांग मतदार - 3 लाख 96 हजार आहेत
· सर्व्हिस मतदार- 1 लाख 17 हजार 581 आहेत

मतदार जनजागृती
· आतापर्यंत 20.8 लाख नागरिकांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. त्यापैकी 14.40 लाख मतदारांनी या यंत्रावर प्रत्यक्ष मतदानाची तालीम घेतली.

जनजागृतीसाठी सदिच्छादूत
· मतदार जागृतीच्या मोहिमेत ‘सदिच्छादूत’ म्हणून अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक, अभिनेत्री माधुरी दीक्षित, अभिनेते प्रशांत दामले, अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, डॉ.निशिगंधा वाड, अभिनेत्री उषा जाधव, महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना, महिला धावपटू ललिता बाबर, अर्जुन पुरस्कार सन्मानित जलतरणपटू वीरधवल खाडे, नेमबाज राही सरनोबत, तृतीयपंथी कार्यकर्त्या गौरी सावंत, दिव्यांग कार्यकर्ता नीलेश सिंगीत यांचा समावेश आहे.

मतदान केंद्रे
· विधानसभा निवडणूक 2019 मध्ये 96 हजार 661 मतदान केंद्रे आहेत.

मुख्य मतदान केंद्र – 95, 473
सहायक मतदान केंद्र – 1,188

· खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदान केंद्रे’ स्थापन केली जातील.

मतदारांसाठी सोयी-सुविधा

· किमान अत्यावश्यक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी, विद्युत पुरवठा, प्रकाश योजना, ब्रेल भाषेतील मतपत्रिका, शौचालय, दिव्यांग मित्र आदी सर्व किमान सुविधा पुरविण्यात येतील.
· दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा देण्यात आली आहे.
· सर्व मतदान केंद्रांवर दिव्यांग तसेच वयोवृद्ध मतदारांकरिता व्हील चेअर व रॅम्पची व्यवस्था
· दिव्यांग तसेच जेष्ठ नागरिक मतदारांकरिता वेगळ्या रांगेची व्यवस्था.
· अंध मतदारांच्या सोयीकरिता मतदान केंद्रांवरील सूचनाफलक आणि मतदार यादी, ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आली आहे. मतदान यंत्रावर ब्रेल लिपी मुद्रित केली असल्याने त्यांना कोणाच्याही मदतीखेरीज मतदान करता येणे शक्य.
· लहान मुलासह मतदानास येणाऱ्या महिला मतदारांच्या मुलांकरिता पाळणाघराची व्यवस्था करण्यात आली आहे.

दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक मतदारांच्या सुविधेसाठी मतदान केंद्राची रचना
· ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग मतदारांना सोयीचे व्हावे, म्हणून पहिल्या अथवा दुसऱ्या मजल्यावरील सुमारे 5400 मतदान केंद्रे तळमजल्यावर स्थलांतरीत.
· पहिल्या वा दुसऱ्या मजल्यावर असलेल्या मतदान केंद्रासाठी आहे, तिथे लिफ्टची व्यवस्था.

यंत्रणा सज्ज

· विधानसभा निवडणुकीसाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट) आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (कंट्रोल युनिट) तर सुमारे एक लाख 35 हजार 21 व्हीव्हीपॅट (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रे पुरवण्यात आली. त्यात राखीव यंत्रांचा देखील समावेश आहे.
· विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी व शांततेत, निर्भयपणे व पारदर्शीपणे निवडणुका पार पाडण्यासाठी पोलीस दल सज्ज आहे.

मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा

· मतदारांना एका क्लिकवर मतदान केंद्र व मतदार यादीतील त्यांची माहिती मिळविण्याची सुविधा भारत निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
· या संकेतस्थळावर स्वतःची संपूर्ण माहिती नमूद केल्यास माहितीचा शोध घेता येतो. माहिती भरताना नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या बाबींचा समावेश करावा. मतदार ओळख क्रमांक व राज्याचे नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याची दुसरी सुविधाही या संकेतस्थळावर आहे.

मतदारांच्या सुविधेसाठी

· आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील ॲपची सुविधा उपलब्ध.
· ईव्हीएम व्हीव्हीपॅट वाहतुक करणाऱ्या वाहनांच्या नियंत्रणाकरिता GPS Tracking App,
· मतदारांच्या मदतीसाठी ‘व्होटर हेल्पलाईन-1950.’ या क्रमांकावर एसएमएस करून मतदारांना माहिती मिळवता येईल.
· मतदारांसाठी ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ ही सुरु.
· दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणे, मतदान केंद्राचा शोध घेणे, व्हिलचेअरची मागणी नोंदविणे यासाठी PwD ॲपची सुविधा.

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र
· मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक.
· भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल अशावेळी पुढील अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.
1. पासपोर्ट (पारपत्र)
2. वाहन चालक परवाना
3 छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम,
सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र)
4. छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबूक
5. पॅनकार्ड
6. राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती
निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड
7. मनरेगा जॉबकार्ड
8.कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड
9. छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज
10. खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र
11. आधारकार्ड
मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील 106 मतदान केंद्रे ही दिव्यांगांद्वारे संनियंत्रित केली जाणार आहेत. यामध्ये सर्वाधिक 8 मतदान केंद्रे ही लातूर शहर मतदारसंघातील असून त्या खालोखाल उदगीर मतदारसंघात 6 मतदान केंद्रे ही दिव्यांग संचालित असतील.
निवडणूक आयोगाने दिव्यांग व्यक्तींना निवडणूकविषयक कामे देऊ नये, असे निर्देश दिले असले तरी दिव्यांग व्यक्ती सक्षमपणे सर्व कामे करू शकतात ही बाब सिद्ध करण्यासाठी निवडणूकविषयक कामात त्यांना सहभागी करून घेतले जात आहे.

विद्यार्थ्यांचे सहाय्य

मतदान केंद्रांवर वयोवृद्ध व दिव्यांग मतदारांना त्यांच्या शारीरिक मर्यादा/विकलांगतेमुळे मतदान केंद्रापर्यंत पोहोचून मतदान करण्यात अडथळे येऊ नये, त्यांना सुलभपणे मतदान करता यावे, यासाठी प्रत्येक केंद्रावर स्वयंसेवकांची नियुक्ती करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

शाळा, महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्रसेना (एनसीसी), नेहरू युवा केंद्र, स्काऊट गाईडचे विद्यार्थी यांची स्वयंसेवक म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे. त्याबरोबरच नागरी संरक्षण विभाग, आपत्त्कालीन परिस्थितीत काम करणारे स्वयंसेवक व गृहरक्षक दल यांची मदतनीस/स्वयंसेवक म्हणून निवड करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

मतदान केंद्रावर दिव्यांग आल्यानंतर त्यांच्या वाहनापासून मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर परत त्या वाहनापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी हे स्वयंसेवक पार पाडतील. मतदान केंद्रावर व्हिलचेअर उपलब्ध करून देणे, पाणी, गरज भासल्यास प्रसाधनगृह व प्रथमोपचार यांची उपलब्धता करून देण्याचे काम हे स्वयंसेवक करतील. या अनुषंगाने या स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्याच्या सूचना सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.
अहमदनगर: राज्यात तेरा वर्षे जर मंत्रीपद देऊन देखील यांना काही काम करता येत नसेल तर हातात बांगड्या भरल्या पाहिजेत. याला आपल्या इथे म्हणतात, नाचता येईना अंगण वाकडे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. ते श्रीगोंदा येथील जाहीर सभेत बोलत होते.

शरद पवार म्हणाले, या ठिकाणी मुख्यमंत्री आले असता आघाडीतील माजी मंत्री व सध्याचे भाजपा नेते बबनराव पाचपुते यांनी भाषणात सांगितले की, १३ वर्षे मला मंत्रीपद दिलं, पण मला फक्त सहीचाच अधिकार होता. राज्य सरकारमध्ये वन खातं हे अत्यंत महत्त्वाचं खात असतं. हे खातंही त्यांना देण्यात आलं होतं.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांचे एक भाषण वाचनात आले होते. त्यांनी सभागृहासमोर काही कागदपत्रे ठेऊन हे माजी मंत्री दरोडेखोर असल्याचा आरोप केला होता आणि आज आरोप करणारे मुख्यमंत्री झालेत आणि त्यांचं कौतुक करत आहेत. मुख्यमंत्री साहेब, अहो असं वागणं बरं नव्हं, असा चिमटा देखील पवारांनी काढला.

नगर: कमी मटण खाल्ले म्हणून एकास अंगावर पेट्रोल ओतून दोघांनी पेटवून दिले. संबंधितास उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा प्रकार नगर तालुक्यातील गुंडेगाव येथे सोमवारी (दि.14) रोजी सायंकाळी घडला. याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात दोघांविरूद्ध जिवे मारण्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय पोपट जाधव (वय- 48, रा. गुंडेगाव, ता. नगर) असे जखमी झालेल्याचे व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अधीक माहिती अशी की, बापू एकनाथ हराळ, ज्ञानदेव उत्तम कुसळकर (दोघे रा. गुंडेगाव) यांनी सोमवारी (दि.14) रोजी सायंकाळी सात वाजता संजय जाधव यांना जेवणासाठी घरी बोलावले. यावेळी जेवनासाठी मटणाचा बेत करण्यात आला होता. हे तिघे जेवायला बसले असता हारळ व कुसळकर यांनी जाधव यांना जास्त मटण वाढले. मात्र, जाधव यांचे पोट भरल्याने त्यांनी मटण खाण्यास नकार दिला. याचा हाराळ व कुसळकर यांना राग आल्याने त्यांनी जाधव यास मारहाण केली. त्यानंतर त्यांना रामेश्‍वर मंगल कार्यालयात आणले तेथे त्यांनी जाधव यांच्यावर वार करून गंभीर दुखापत केली. त्यानंतर अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. यामध्ये जाधव गंभीर जखमी झाले.

जामखेड: कर्जत-जामखेड विधानसभा निवडणुकीचे मतदान पाच दिवसांवर आल्यानं प्रचाराला जोर चढला आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख नेते प्रचारात उतरले असून कानाकोपऱ्यात जाहीर सभा, रोड शो आणि भाषणांचा धडाका सुरू आहे. सत्ताधारी व विरोधक एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडत आहेत. तर, काही ठिकाणी युतीमध्ये आपसातच तुंबळ सुरू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्या ग्रामविकास मंत्री पंकजाताई मुंडे यांची जामखेड शहरात जाहीर सभा होणार आहे.

पंकजा मुंडे काय बोलतात? याकडे कर्जत जामखेड तालुक्‍यातील जनतेचे लक्ष लागले आहे.

मुंबई: लोकशाहीचा राष्ट्रीय उत्सव असणाऱ्या निवडणुकांत मतदारांनी सक्रिय सहभाग नोंदविण्यासाठी जाणीवजागृती करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना पहिल्यांदाच राष्ट्रीय पुरस्काराने भारत निवडणूक आयोगातर्फे गौरविले जाणार आहे. भारत निवडणूक आयोगामार्फत मुद्रित माध्यम, दूरचित्रवाहिनी, रेडिओ आणि ऑनलाईन (इंटरनेट)/सोशल मीडिया या चार गटात हे पुरस्कार देण्यात येतील.
लोकशाही बळकटीकरणासाठी 2019 मध्ये होणाऱ्या निवडणुकांत जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी निवडणुकीच्या संपूर्ण प्रक्रियेसंदर्भात जनजागृती, सर्वसामान्यांमध्ये मतदान जागृती व मतदार नोंदणीसाठी विशेष प्रयत्न करणाऱ्या प्रसारमाध्यम संस्थांना 25 जानेवारी 2020 रोजी होणाऱ्या राष्ट्रीय मतदार दिन कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येतील. मतदार जागृती मोहीम, मोठ्या प्रमाणातील विशेष प्रसिद्धी, जनतेवर पडलेला प्रभाव या निकषांवर पुरस्कारांची निवड करण्यात येईल. त्यासाठी माध्यम संस्थांनी 31 ऑक्टोबर 2019 पर्यंत अर्ज करावे, असे आवाहन भारत निवडणूक आयोगाचे अवर सचिव (संवाद) श्री. पवन दिवाण यांनी केले आहे.

प्रसारमाध्यमांनी इंग्रजी आणि हिंदीमधून प्रवेशिका पाठवाव्यात. इतर कोणत्याही भाषेतून या स्पर्धेसाठी प्रवेशिका पाठवता येईल. मात्र त्यासोबत इंग्रजीतून भाषांतर केलेली प्रत सोबत जोडावी लागेल. संपर्क - श्री. पवन दिवाण, अवर सचिव (कम्युनिकेशन), भारत निवडणूक आयोग, निर्वाचन सदन, अशोका रोड, नवी दिल्ली – 110001, ईमेल- media.election.eci@gmail.com, अथवा diwaneci@yahoo.co.in, दूरध्वनी क्र. 011-23052133.

मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या मतदान कालावधीमध्ये कोणत्याही प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास भारत निवडणूक आयोगाने मनाई केली आहे. याशिवाय मतदान संपण्याच्या वेळेपूर्वी अठ्ठेचाळीस तासाच्या कालावधीत कोणत्याही प्रकारचे जनमत चाचण्यांचे अंदाज (ओपिनियन पोल) जाहीर करण्यासही मनाई करण्यात आली आहे.

राज्यात दिनांक 21 ऑक्टोबर 2019 रोजी विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचे तसेच सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचे मतदान होत आहे. या पार्श्वभूमीवर दिनांक 21 ऑक्टोबर रोजी सकाळी 7 वा. ते सायंकाळी 6.30 वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या मतदानोत्तर अंदाज चाचण्यांचे सर्वेक्षण आयोजित करण्यास; तसेच वृत्तपत्रे इलेक्ट्रॉनिक माध्यमे अथवा अन्य कोणत्याही प्रकारे त्यातील अंदाज (एक्झिट पोल) जाहीर करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे.

तसेच मतदानाच्या समाप्तीच्या वेळेआधी 48 तास कोणत्याही जनमत चाचणीचे अंदाज (ओपिनियन पोल) किंवा अन्य कोणत्याही निवडणूक सर्वेक्षणाचे अंदाज इलेक्ट्रॉनिक माध्यमातून प्रसिद्ध करता येणार नाहीत, असेही भारत निवडणूक आयोगामार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.
मुंबई : भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून निबंधाची प्रवेशिका दि. 31 डिसेंबर 2019 पर्यंत पाठवावी, असे आवाहन संस्थेकडून करण्यात आले आहे.
भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखेकडून दरवर्षी कै. श्री. बी. जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा आयोजित करण्यात येते. त्यानुसार सन 2019- 2020 या वर्षाच्या निबंधस्पर्धेसाठी ‘जल व्यवस्थापन’ (वॉटर मॅनेजमेंट) आणि ‘महाराष्ट्रातील प्रादेशिक असमानता लक्षात घेऊन राज्यातील पोषण स्थिती’ (द स्टेटस ऑफ न्युट्रिशन इन महाराष्ट्र कन्सिडरिंग रिजनल डिस्पॅरिटीज इन द स्टेट) हे दोन विषय निवडण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी पहिले पारितो‍षिक 7 हजार 500 रुपये, दुसरे पारितोषिक 6 हजार रुपये, तिसरे 3 हजार 500 तर उत्तेजनार्थ 2 हजार रुपयांचे पारितोषिक ठेवण्यात आले आहे.

निबंध हा ठरवून दिलेल्या कोणत्याही एका विषयावर इंग्रजी किंवा मराठीतून आणि 3 हजार ते 5 हजार शब्दमर्यादेत असावा. निबंध हा विषयानुसार विश्लेषणात्मक, संशोधनपर व पदव्युत्तर दर्जाचा असणे अपेक्षित आहे. कागदाच्या एकाच पृष्ठभागावर टंकलिखित करुन त्यावर टोपणनाव लिहून चार प्रतीत सादर करावा. स्पर्धकाने निबंधावर आपले नाव किंवा कोणत्याही प्रकारची ओळख नमूद करु नये.

निबंधाचे मूल्यमापन हे संस्थेच्या परीक्षक मंडळाकडून करण्यात येईल. पारितोषिक देण्याबाबत संस्थेचा निर्णय अंतिम राहील. संस्थेच्या वतीने यापूर्वी घेतलेल्या स्पर्धेत पारितोषिक विजेता ठरलेला किंवा उत्तेजनार्थ पारितोषक प्राप्त स्पर्धक हा लगतची तीन वर्षे या स्पर्धेत भाग घेण्यास पात्र असणार नाही.

निबंधावर टोपणनाव लिहून निबंधाच्या चार प्रती असलेला लिफाफा, टोपणनाव व त्याबाबतचे स्पर्धकाचे संपूर्ण नाव व पत्ता असलेला वेगळा लिफाफा एका मोठ्या लिफाफ्यामध्ये बंद करुन त्यावर कै. श्री. बी.जी. देशमुख वार्षिक निबंध स्पर्धा, 2019-2020 असे नमूद करावे व तो मानद सचिव, भारतीय लोक प्रशासन संस्था, महाराष्ट्र विभागीय शाखा, तळमजला, बँक ऑफ महाराष्ट्रच्या बाजूला, मंत्रालय, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मुंबई 400032 या पत्त्यावर दिनांक 31 डिसेंबर 2019 पर्यंत पाठवावा. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 22793430 किंवा 22024243/22854156 वर किंवा js.mrb-iipa@gov.in या ईमेलवर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.
शेवगाव – ही निवडणूक पक्षासाठी नसून, जुलमाच्या जोखडातून महाराष्ट्राची सुटका करण्यासाठी आहे. त्यासाठी आजचा तरुणच सरसावला असून, त्यानेच सत्ता बदलाचा निर्धार केला आहे. त्यामुळे राज्याच्या सत्तेत परिवर्तन अटळ असल्याचे भाकीत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
राष्ट्रवादीचे उमेदवार ऍड. प्रताप ढाकणे यांच्या प्रचारार्थ बोधेगाव येथे आयोजित प्रचार सभेत पवार बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय मंत्री बबनराव ढाकणे होते. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, माजी आ. चंद्रशेखर घुले, डॉ. मेधा कांबळे, तालुक्‍यातील विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पवार म्हणाले, पंतप्रधानांना व गृहमंत्र्यांना विधानसभेसाठी सभा घ्याव्या लागतात. हे त्यांच्या पायाखालची वाळू सरकल्याचे द्योतक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकार निष्क्रिय आहे. बेरोजगारी वाढली आहे. एका वर्षात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. कंपन्या बंद पडत आहेत. शेतमालाला भाव नाही. मात्र सत्ताधारी 370 कलम हटवले या विषयावरच बोलतात.

पाच वर्षांपूर्वी ज्याचे नाव माहीत नव्हते ते अमित शहा शरद पवार यांनी महाराष्ट्रासाठी काय केले, असा प्रश्न विचारत आहेत. मी मुख्यमंत्री असताना मराठवाडा विद्यापीठाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ असे नामांतर, महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत 50 टक्के आरक्षण दिले, मंडल आयोगाची अंमलबजावणी करून ओबीसींना न्याय दिला.
कोपरगाव – देशाच्या पंतप्रधानांची 56 इंचाची छाती असल्याचे सांगून 370 कलम हटविल्याचा मुद्दा विधानसभा निवडणुकीत आणून भाजप सरकार मुळ मुद्द्याकडे दुर्लक्ष करीत आहे. एका काश्‍मिरमधील 370 कलम हटविले, त्याला आम्ही सभागृहामध्ये सहमती दिली. मात्र 371 कलमाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व सरंक्षणमंत्री अमित शहा गप्प का? असा सवाल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोपरगाव येथील प्रचार सभेत केला.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील आघाडीचे उमेदवार आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मैदानावर सोमवारी सायंकाळी झालेल्या प्रचार सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार अशोक काळे होते.

यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार आशुतोष काळे, जिल्हा बॅकेच्या संचालिका चैताली काळे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, जिल्हा कार्याध्यक्ष संदिप वर्पे, संजीव भोर, सभापती अनुसया होन, माजी नगराध्यक्ष पद्‌माकांत कुदळे, मंगेश पाटील, डॉ.अजय गर्जे, अशोक खांबेकर आदींची उपस्थिती होती. पवार पुढे म्हणाले, राज्यात शेतकरी देशोधडीला लागला, अनेक कारखाने बंद पडत असल्याने कामगारांच्या हाताला काम मिळेना, उद्योगधंदे डबघाईला आले, बाजारपेठा ओस पडत आहेत, शेती सिंचनाचा प्रश्‍न राज्यात गंभीर झाल्याने शेतमालाला भाव मिळेना.पुणतांबा – गेली पाच वर्षे कोपरगाव मतदारसंघातील प्रश्‍नांसाठी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी सातत्याने पाठपुरावा करून मतदारसंघाचा विकास केला. विकासनिधी मिळवण्यासाठी सातत्याने धडपड करून संघर्ष केला. त्यांच्या कामामुळे त्यांनी मतदारसंघात विकासाची बुलेट ट्रेन निर्माण केली, असे प्रतिपादन राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार स्नेहलता कोल्हे यांच्या प्रचारार्थ पुणतांबा येथे झालेल्या जाहीर सभेत ना. मुनगंटीवार बोलत होते. अध्यक्षस्थानी गंगाधर चौधरी होते. यावेळी व्यासपीठावर भाजपचे रवींद्र बोरावके, सचिन तांबे, तालुकाध्यक्ष शरद नाना थोरात, नंदकुमार जेजुरकर, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, तालुकाप्रमुख शिवाजीराव ठाकरे, पुणतांबाचे धनंजय जाधव, भाजपचे शहराध्यक्ष अमोल सराळकर, शिवसेनेचे शहरप्रमुख महेश कुलकर्णी, सर्जेराव जाधव, रिपाईचे दीपक गायकवाड, किरण खर्डे आदी मान्यवर उपस्थित होते.

ना. मुनगंटीवार म्हणाले, आमदार कोल्हे यांनी पाच वर्षाच्या काळात महिला आमदार म्हणून विधानभवनामध्ये नावलौकिक मिळवला. ज्यांनी देशात साठ वर्ष सत्ता भोगली. त्यांनी विकास न करता देशाला मागे नेले, जनतेला फसवले, सत्तेच्या काळात जनतेचा भ्रमनिरास केला ते आज आम्हाला पाच वर्षाचा हिशोब मागत आहे.
मुंबई : विधानसभा निवडणूक 2019 साठी विविध राजकीय पक्ष व अपक्ष मिळून 235 महिला उमेदवार आहेत.

या निवडणुकीत एकूण 3 हजार 237 उमेदवार असून यामध्ये 3,001 पुरुष उमेदवारांचा समावेश आहे.चिंचवड मतदारसंघात जनहित लोकशाही पक्षामार्फत नितीश दगडू लोखंडे हे तृतीयपंथी उमेदवार निवडणूक लढवित आहेत.
मुंबई : आपण कितीही कार्यमग्न असलो तरी पुस्तक वाचण्याची सवय आपण स्वत:ला लावून घेणे गरजेचे असून, पुस्तकांमुळे आपल्याला मनन, चिंतन आणि लेखन करण्याची ऊर्जा मिळते असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.
भारताचे माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरी केली जाते. त्यानिमित्ताने आज राजभवन येथे डॉ. कलाम यांना अभिवादन करण्यात आले आणि त्यानंतर राजभवन येथील अधिकारी व कर्मचारी यांनी काही कविता, गोष्टी, उतारे उपस्थितांना वाचून दाखवत अनोख्या पद्धतीने वाचन प्रेरणा दिन साजरा केला. या कार्यक्रमास राजभवन येथील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम हे वैज्ञानिक होते, त्यांच्या कार्याला मनन आणि चिंतनाची भक्कम बैठक होती. आजच्या तरुणांनी वाचले पाहिजे असा त्यांचा आग्रह होता. त्यांनी लिहिलेले प्रत्येक पुस्तक सकारात्मकतेचा संदेश देणारे आहे. त्यांच्या जयंतीनिमित्ताने आपण सर्वांनी वाचनसंस्कृती वृध्दिंगत करण्यासाठी प्रयत्न करुया, असेही आवाहन राज्यपाल यांनी यावेळी केले.

मुंबई : विधानसभा निवडणुकांसाठी सध्या उमेदवार आपला प्रचार करण्यासाठी विविध माध्यमांचा वापर करीत आहे. मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत आतापर्यंत 419 चलचित्र वाहनांना (मोबाईल एलईडी व्हॅन) परवानगी देण्यात आली आहे.
निवडणुकीमध्ये आपला प्रचार करण्यासाठी उमेदवार चलचित्र वाहनांचा वापर करतात. गावोगावी ही चलचित्र वाहने पोहोचतात आणि प्रचार व प्रसार करतात. मात्र उमेदवाराला चलचित्र वाहनांद्वारे प्रचार व प्रसार करताना संबंधित परिवहन अधिकारी यांच्याकडून वाहनाचे फिटनेस प्रमाणपत्र घ्यावे लागते आणि हे प्रमाणपत्र मुख्य निवडणूक कार्यालयाकडे जमा करावे लागते. मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत संबंधित चलचित्र वाहनांचे प्रमाणपत्र, वाहनांची इतर कागदपत्र तपासून घेतल्यानंतरच या वाहनांमधून प्रचार करण्याची परवानगी देण्यात येते. मुख्य निवडणूक कार्यालयामार्फत 419 चलचित्र वाहनांना परवानगी देण्यात आली आहे.
जामखेड: कर्जत येथे उमेदवारी अर्ज दाखल करताना मतदारांची झालेली उत्स्फूर्त गर्दी व त्यानंतर सर्व समाजातून मिळणारा पाठिंबा, गावभेट दौऱ्यात महिलांचा सहभाग, मुस्लिम समाज व युवकांचा ओढा यामुळे दिवसेंदिवस जनतेचे समर्थन वाढत आहे. त्यामुळे 21 तारखेनंतर रोहीत पवार यांचे पार्सल मतदारसंघात दिसणार नाहीत अशी खोचक टीका पालकमंत्री राम शिंदे यांनी प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलताना केली.

शिंदे यांनी प्रचारार्थ जामखेड तालुक्‍यातील दिसलेवाडी, सांगवी, मुसलमानवाडी, झिक्री, धोंडपारगाव,राजेवाडी, नान्नज, महारुळी, वाघा, पिपळगाव उंडा, आपडी, पिंपळगाव आवळा, राजुरी गावांना भेट दिली. यावेळी गौतम उतेकर, सुभाष आव्हाड, सोमनाथ पाचारणे, मनोज कुलकर्णी, विद्याताई मोहळकर, तुषार पवार, सचिन मलंगनेर, आश्रू खोटे, आजीनाथ हजारे, रवींद्र सुरवसे, महेश निमोणकर, तुकाराम मोहळकर यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
जामखेड: कोणाला विरोध करण्यासाठी नव्हे तर विकासाचा संकल्प घेऊन निवडणूक लढवत आहे. मोठे प्रकल्प आणून या भागाला सुजलाम सुफलाम करण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे. तसेच टीकेऐवजी मतदारांच्या भवितव्याला प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी केले.
आज राष्ट्रवादीचे उमेदवार रोहित पवार यांनी जामखेड तालुक्‍यातील आनंदवाडी, धामणगाव, तेलंगशी, गीतेवाडी, दरडवाडी, चव्हाणवाडी, सातेफळ, पांढरेवाडी, व शहरातील प्रभाग क्रमांक 12, निमोणकर वस्ती येथे मतदारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

पवार म्हणाले, तालुक्‍यात सिंचनप्रकल्प, क्रीडासंकुल, आरोग्य सुविधा उपलब्ध नाहीत. वैयक्तिक लाभाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होत नाही. तरुणांच्या हाताला काम नाही. रस्ते, पाणी, वीज या मूलभूत सुविधांचा पाठपुरावा झाला नाही. यावेळी राष्ट्रवादीचे राजेंद्र कोठारी, तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, मधुकर राळेभात, सूर्यकांत मोरे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, जमीर सय्यद, उमर कुरेशी, नगरसेवक दिंगबर चव्हाण यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
श्रीगोंदा: श्रीगोंद्याचे राजकीय रणांगण आता चांगलेच तापू लागले आहे. दिग्गजांच्या सभांमुळे निवडणुकीत रंग चढू लागला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार घनश्‍याम शेलार यांच्यासाठी शरद पवार, तर भाजप उमेदवार बबनराव पाचपुते यांच्यासाठी स्मृती इराणी श्रीगोंद्यात सभा घेणार आहे.

राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष ऋषिकेश गायकवाड म्हणाले, बुधवारी (दि.16) सकाळी 10 वा. पवार प्रचारार्थ येणार आहे. येथील महंमद महाराजांच्या मैदानात ही सभा आघाडीचे उमेदवार घनश्‍याम शेलार यांच्यासाठी होत आहे.
तर भाजपचे तालुका उपाध्यक्ष मिलिंद दरेकर म्हणाले, भाजपचे उमेदवार माजी मंत्री बबनराव पाचपुते यांच्या प्रचारासाठी महिला व बालविकास आणि वस्त्रोद्योग केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची 15 ऑक्‍टोबरला सकाळी 10 वाजता श्रीगोंद्यात सभा होणार आहे. शेख महंमद महाराज यांच्या प्रांगणात ही सभा होईल.
नुह (हरियाना) – पंतप्रधान नरेंद्र मोदी हे केवळ श्रीमंत उद्योगपतींचेच लाऊडस्पीकर आहेत गरीबांच्या खिशातील पैसे काढून ते आपल्या श्रीमंत मित्रांना अधिक श्रीमंत करीत आहेत अशी टीका कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली आहे. आज येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना त्यांनी ही टीका केली. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचेही वागणे मोदींसारखेच असून त्यांनाहीं गरीबांची काही चिंता नाही असे ते म्हणाले.

मोदी व खट्टर हे स्वताला प्रखर राष्ट्रभक्त म्हणवतात, मग ते सरकारी मालकीच्या कंपन्या श्रीमंतांना का विकत आहेत असा सवालही त्यांनी केला. ब्रिटीशांनी जशी धर्म, जात आणि प्रदेशाच्या आधारावर देशाची विभागणी केली तशीच विभागणी संघ आणि भाजप परिवारातील लोक करीत आहेत असा आरोपही त्यांनी केला.

मोदी हे तुम्हाला केवळ ट्रम्प आणि अंबानी यांच्या बरोबरच दिसतील ते तुम्हाला कधीही शेतकऱ्यांबरोबर दिसणार नाहीत असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
नवी दिल्ली : राज्य शासनाच्या वतीने सुरु असलेल्या सर्व टोल प्लाझावर आता ‘फास्टॅग’ यंत्रणा कार्यान्वित होणार असून यामुळे टोल वसुलीच्या कामामध्ये पारदर्शकता येणार असून या कामास गती मिळणार आहे. ‘फास्टॅग’ संदर्भात आज राज्याच्या वतीने सामंजस्य कराराचे अनौपचारिक हस्तांतरण झाले.

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या वतीने देशभरात कार्यरत टोल प्लाझांवर ‘फास्टॅग यंत्रणा’ कार्यान्व‍ित असून मंत्रालयाच्या आवाहनाला प्रतिसाद देत देशातील काही राज्यांनी ही यंत्रणा राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रानेही फास्टॅग यंत्रणा राबविण्याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाच्या भारतीय रस्ते वाहतूक व्यवस्थापन कंपनी (आयएचएमसीएल) सोबत दोन महिन्यांपूर्वीच सामंजस्य करार केला आहे.

डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल सेंटर येथे आज आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सह व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे आणि ‘आयएचएमसीएल’चे वरिष्ठ अधिकारी यांच्यामध्ये अनौपचारिकरित्या सामंजस्य कराराचे हस्तांतरण झाले.

डिसेंबरअखेर राज्यात फास्टॅग यंत्रणेबाबतची तयारी होणार पूर्ण

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्रालयाने राज्याला यावर्षी डिसेंबर महिन्याअखेर फास्टॅग यंत्रणेबाबतची तयारी पूर्ण करण्याचे निर्देश दिले असून नियत वेळेत हे काम पूर्ण करू असा विश्वास श्री. वाघमारे यांनी व्यक्त केला आहे. राज्यातील केंद्र शासनाच्या टोल प्लाझांवर फास्टॅग यंत्रणा कार्यान्व‍ित झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने सुरु असलेल्या राज्यातील एकूण 73 टोल प्लाझांवरही फास्टॅग यंत्रणा कार्यान्व‍ित करण्यात येणार असल्याचेही श्री. वाघमारे यांनी सांगितले.
...असे आहेत फास्टॅग यंत्रणेचे फायदे!

फास्टॅग यंत्रणेमुळे वाहतूकदार, टोल प्लाझा चालक आणि सरकारला फायदा होणार आहे. फास्टॅग यंत्रणेचा वापरकर्त्या वाहतूकदाराला प्रती व्यवहारावर 2.5 टक्के सूट मिळणार आहे. तसेच, या प्लाझावर विना थांबा वाहतूक असल्याने वाहतूकदारांच्या वेळेची बचत होणार आहे. ई-पेमेंटमुळे रोख रक्कम बाळगण्याची गरज भासणार नाही. या व्यवहाराची पावती थेट मेलवरच मिळणार असल्याने तसा लेखाजोखाही ठेवता येणार आहे.
'फास्टॅग'मुळे टोल प्लाझा चालकांना प्लाझा चालविण्यासाठी येणाऱ्या खर्चात बचत होणार आहे. स्वयंचलित एकिकृत संगणकीय व्यवस्थेमुळे प्लाझा चालकांना लेखे-जोखे अद्ययावत ठेवता येणार आहे. तसेच, कमीतकमी यंत्रणा राबवून प्रभावी सुविधा पुरविता येणार आहे.

केंद्र व राज्य शासनाला फास्टॅगमुळे इंधन बचत करणे ,कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण घटविणे शक्य होईल. तसेच टोल प्लाझा व्यवस्थेमध्ये पारदर्शकता ठेवता येणार आहे व या यंत्रेणस गतीही देता येईल.
मुंबई : ‘लोकराज्य’च्या ऑक्टोबर 2019 च्या महात्मा गांधी यांचेवरील ‘युगपुरुष’ या विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे आज करण्यात आले. यावेळी मुख्य संपादक ब्रिजेश सिंह, प्रबंध संपादक अजय अंबेकर, संपादक सुरेश वांदिले आदी उपस्थित होते.या विशेषांकात गांधीजींच्या आयुष्यातील विविध टप्प्यांचा आढावा घेण्यात आला आहे. व्रतस्थ कर्मवीर, सर्वधर्म समभाव, श्रमप्रतिष्ठेचा आदर, वैज्ञानिक वारकरी, स्वच्छतेचा उपासक, राष्ट्रपिता आणि राष्ट्रसंत, आहारतज्ज्ञ यासारख्या लेखांतून गांधीजींच्या आयुष्यातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला आहे.

‘तुम्ही गांधीजींना किती ओळखता?’ भागामध्ये गांधीजींच्या जीवनप्रवासावर आधारित 150 प्रश्नोत्तरे देण्यात आली आहेत. गांधीजींचा संक्षिप्त जीवन परिचय आणि महात्मा गांधीजींची दुर्मिळ छायाचित्रे ही या अंकाची वैशिष्ट्ये आहेत. 68 पृष्ठांच्या या अंकाची किंमत 10 रुपये असून तो सर्वत्र उपलब्ध आहे.
मुंबई : आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्या हिंदू राष्ट्राच्या वक्तव्यावर एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी  यांनी वादग्रस्त असे ट्वीट केले आहे. भारत कधी हिंदू राष्ट्र नव्हता, नाही आणि कधीही नसेन, असं ट्वीट असदुद्दीन यांनी केलं आहे.

“भारतातील माझ्य इतिहासाला हिंदू हे नवं नाव देत ते मिठवू शकत नाही. त्यांची ही खेळी यशस्वी ठरणार नाही. ते लोकांना जबरदस्तीने सांगू शकत नाही की, आपली संस्कृती, पंथ आणि व्यक्तीगत ओळख सर्व हिंदू धर्माने जोडलेली आहे. भारत कधी हिंदू राष्ट्र नव्हता, नाही आणि कधीही नसेन, इंशाल्लाह”, असं ट्वीट असदुद्दीन ओवैसी यांनी केले.
सोलापूर: कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर  सडकून टीका केली आहे. शरद पवारांनी येरवडा तुरुंगात जाऊन महात्मा गांधींच्या शेजारची खोली  घ्यावी आणि तेथेच रहावं, असा सल्ला सदाभाऊ खोत यांनी पवारांना  दिला आहे. ते पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रचारासाठी मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे आले होते.
सदाभाऊ खोत म्हणाले, “शरद पवार येरवडामध्ये गेले, तर त्यांनी महात्मा गांधींच्या शेजारची खोली घेऊन तिथंच राहावं. तुरुंगात गेल्यानंतर आघाडीच्या काळात आमच्यावर गुन्हे करणाऱ्या पवारांना आमचं दुःख काय असतं हे कळेल.”

यावेळी बोलताना सदाभाऊ खोत यांनी शरद पवारांनी आपल्यावर खोटे गुन्हे दाखल केल्याचाही आरोप केला. ते म्हणाले, “आम्ही शेतकरी संघटनेमध्ये काम करत असताना आघाडी सरकारने कितीतरी गुन्हे आमच्यावर दाखल केले. त्यातील अनेक गुन्हे तर आम्ही तेथे नसताना आमच्या नावावर टाकले. एकदा तर मी येरवड्यात असताना माझ्यावर कराडमध्ये टँकर फोडल्याचे गुन्हे दाखल केले. त्यामुळं आमचे अनेक दिवस कोर्टात हेलपाटे मारण्यातच गेले.”

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी  मागाठाणे आणि दिंडोशी मतदारसंघातील आपल्या प्रचारसभेत सत्ताधारी भाजपसह शिवसेनेला जोरदार लक्ष्य केलं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आता निवडणुकीत निवडून आलो, तर आरेला जंगल घोषित करण्याचं आश्वासन देतात. एका रात्रीत 2700 झाडं तोडली तेव्हा शांत होते. मग आता गवत लावून जंगल घोषित करणार का? असा सवाल राज ठाकरेंनी  उद्धव ठाकरेंना केला.

राज ठाकरे म्हणाले, “सरकारने एका रात्रीतून आरेतील 2700 झाडं तोडली. मात्र, त्यानंतर आलेल्या शिवसेनेच्या जाहीरनाम्यात आरेवर एक शब्दही नाही. उद्धव ठाकरे आता निवडणुकीत निवडून आलो, तर आरेला जंगल घोषित करण्याचं आश्वासन देतात. पण निवडून आल्यावर ते गवत लावून जंगल घोषित करणार आहे का?”

भाजप-शिवसेना “हीच ती वेळ” म्हणत आहेत, मग मागील 5 वर्ष हे काय करत होते? मागील 5 वर्ष हे फक्त हा घ्या आमचा राजीनामा म्हणत होते. यातच त्यांचे 5 वर्ष निघून गेले, असाही टोला राज ठाकरेंनी लगावला. बँका बुडत असताना सरकार आणि रिझर्व्ह बँक जबाबदारी घेत नाही. मग सर्वसामान्यांच्या पैशांची जबाबदारी कोणाची? पीएमसी बँकेच्या संचालकपदावर भाजपचे लोक आहेत. त्यांनी बँकेवर निर्बंध येण्याआधी एक दिवस नातेवाईकांना पैसे काढण्यास सांगितलं. सर्वसामान्यांचं काय?, असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

चंदीगड : हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींवर टीका करताना जीभ घसरली आहे. महाराष्ट्रासह हरियाणातही विधानसभा निवडणुकीचा प्रचार जोरदार सुरु आहे. काँग्रेस आणि भाजपमध्ये महाराष्ट्र आणि हरियाणा या दोन्ही राज्यात चांगलीच चुरस दिसत आहे. 

सर्व नेते एकमेकांवर टीका करत आहेत. या दरम्यान मुख्यमंत्री खट्टर यांची जीभ घसरल्याने विरोधकांकडून त्यांच्यावर जोरदार टीका केली  जात आहे.

या निवडणूक प्रचारादरम्यान मुख्यमंत्री खट्टर यांनी सोनिया गांधींची तुलना मेलेल्या उंदरासोबत केली आहे. “राहुल गांधींच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस अध्यक्षपदासाठी संपूर्ण देश फिरला. पण डोंगर पोखरला आणि त्यात मेलेलं उंदीर मिळाला”, असं खट्टर सेनापती येथील सभेत म्हणाले.
जामखेड: सध्या राज्यभर निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. आपापल्या प्रचारासाठी उमेदवार वेगवेगळ्या युक्ती लढवत आहेत. अशीच एक भन्नाट युक्ती संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कर्जत जामखेड मतदार संघात पाहायला मिळतेय. महाआघाडीचे उमेदवार रोहित पवार यांच्या प्रचारासाठी तालुक्यातील बेनवडी येथील शिवाजी गदादे व पुणे नगरसेविका प्रिया गदादे यांनी आगळा वेगळा ‘विजयरथ’ साकारला आहे.
या रथावर चहू बाजूनी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या रथाच्या समोरील छतावर घड्याळ टांगले आहे. तर दर्शनीय बाजूस राष्ट्रवादीसह इतर मित्रपक्षांचे झेंडे लावण्यात आले असुन, या रथामध्ये विठ्ठलाचे रूप धारण केलेला युवक उभा आहे. पवार यांच्या विजयात या विजयरथाचाही वाटा असेल असा विश्वास यावेळी शिवाजी गदादे यांनी बोलताना व्यक्त केला.

कर्जत-जामखेडच नव्हे तर राज्यभरातुन राष्ट्रवादी पक्षावर अतोनात प्रेम असलेले असंख्य कार्यकर्ते आहेत. कर्जत जामखेडचा विचार केला तर अनेकांनी रोहित पवार यांच्या विजयासाठी वेगवेगळे पण केले आहेत. रोहित पवार आमदार झाल्यानंतरच अंगात शर्ट चढवेल, पायात चप्पल घालेन, दाढी करेल, काहींनी तर रोहित पवार आमदार होत नाहीत तोपर्यंत विवाह करणार नसल्याची खूणगाठ बांधलेले कार्यकर्ते मतदारसंघात पहायला मिळत आहेत.

मुंबई : यंदाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये 9 हजार 673 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार आहे. यामध्ये संवेदनशील मतदान केंद्रांचा समावेश आहे.

विधानसभा निवडणुकांसाठी 288 आदर्श मतदान केंद्र (मॉडेल पोलिंग सेंटर) उभारण्यात येतील. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर 15 प्रकारच्या मुलभूत सुविधा उपलब्ध करुन दिल्या जातील. दुर्गम भागात असलेल्या मतदान केंद्रावर मतदारांची विशेष काळजी घेण्यात येईल. वृद्ध नागरिकांसाठी रॅम्प, मतदारांसाठी पिण्याचे पाणी, प्रसाधनगृह, विद्युत पुरवठा या बाबींवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदारसंघात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

राहुरी विद्यापीठ – मुळा धरणाचे हक्काचे पाणी मिळवून देण्याची धमक तनपुरेमध्येच आहे. यावेळेस राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांनाच साथ देण्याचे आश्‍वासन पाथर्डी तालुक्‍यातील शिंगवे, रूपेवाडी, मिरी, कडगाव, खांडगाव, शंकरवाडी, शिराळ चिंचोडी, लोहसर आदी गावातील ग्रामस्थांनी दिले.

राष्ट्रवादीचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांच्या दौऱ्यावेळी ग्रामस्थांनी आपल्या तक्रारीचा पाढा वाचत यंदा मतदारसंघामध्ये परिवर्तन घडविण्याचा निर्धार व्यक्त केला. याप्रसंगी अनेक ग्रामस्थांनी पाण्याचा प्रश्‍न उपस्थित करून केंद्र व राज्य शासनाच्या ध्येय धोरणांमुळे शेती संकटात आल्याचे सांगितले. नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांनी आ. शिवाजीराव कर्डिले यांच्यावर टीका केली.
तनपुरे म्हणाले, आ. कर्डिले यांच्या निष्क्रियतेमुळे मुळा धरणाचे हक्काचे 3 टिएमसी पाणी बीड जिल्ह्याला दिले जात आहे.

गुन्हेगारी पार्श्‍वभूमी व वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये गुंतलेल्या आ. कर्डिले हे शासनाच्या हुकूमशाही धोरणांचा विरोध करूच शकत नाही. मुळा धरण लाभार्थी तहानलेले असतानाही हक्काचे पाणी जायकवाडीला जाताना पाहण्याची नामुष्की गेल्या अनेक वर्षांपासून ओढावत आहे. समन्यायी पाणी वाटप कायद्यावेळी सही करून संमती देणाऱ्या आ. कर्डिले यांनी शेतकऱ्यांची माफी मागण्याचे आवाहन तनपुरे यांनी केले. अमोल जाधव, विजू कुटे, अशोक गवळी, अशोक निमसे, सुभाष गवळी, जालिंदर वामन, प्रकाश शेलार, भागिनाथ गवळी, महादेव कुटे, आदिनाथ सोलट, राजू शेख, चंद्रकांत गवळी, बाबासाहेब झाडे, करीम शेख यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.
अकोले – निळवंडे प्रकल्पाबाबत सद्यस्थितीचा अहवाल देण्याचा उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत, अशी मागणी निळवंडे कालवा कृती समितीच्यावतीने देण्यात आली आहे. यावर पुढील सुनावणी 5 नोव्हेंबर रोजी होणार आहे.

उत्तर नगर जिल्ह्यातील 182 दुष्काळी गावांना वरदान ठरणाऱ्या निळवंडे प्रकल्पाच्या धरण व कालव्यांची सद्यस्थिती बाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली जलसंपदाच्या अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी या चार उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रकल्पाच्या कामांचा अहवाल तीन आठवड्यांच्या आत देण्याचे आदेश उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्न वराळे व न्या. अविनाश घारोटे यांच्या न्यायपीठाने दिल्याची माहिती निळवंडे कालवा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. तसेच या निर्णयाबद्दल समाधान व्यक्त केले.

उत्तर नगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव, राहुरी, श्रीरामपूर, सिन्नर आदी सात तालुक्‍यांतील दुष्काळी 182 गावांतील 64 हजार 260 हेक्‍टर साठी निळवंडे धरण प्रकल्प मंजूर करण्यात आला. मात्र अद्याप 49 वर्षानंतरही हा प्रकल्प पूर्ण करण्यात आलेला नाही. राज्यातील आघाडी सरकारच्या काळात 70 हजार कोटींचा सिंचन घोटाळा झाल्याने या प्रकल्पाला निधी मिळण्याचा मार्ग जवळपास बंद झाल्याने निळवंडे कालवा कृती समितीने केंद्र सरकारच्या तत्कालीन वेग वर्धित सिंचन प्रकल्पात या प्रकल्पाचा समावेश करण्यासाठी केंद्रीय जल आयोगाच्या सतरा मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

2014 अखेर केंद्राकडून चौदा मान्यता मिळवल्या. दरम्यान केंद्रात व राज्यात भादपचे सरकार आले. मात्र पाठपुरावा करूनही राज्य सरकार दोन मान्यता देईना. त्यामुळे कालवा कृतीसमितीने या बाबत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सप्टेंबर 2016 मध्ये शेतकरी विक्रांत रुपेंद्र काले व नानासाहेब जवरे यांच्या मार्फत ऍड. अजित काळे यांच्या मार्फत जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला होता.

त्याची अल्पावधीत सुनावणी होऊन सरकारला दोन हजार 369.95 कोटी रुपयांची चौथी सुप्रमा, व राज्याच्या वित्त विभागाची हमी या मान्यता द्याव्या लागल्या. त्यानंतर केंद्र सरकारला दोन हजार 232 कोटी रुपयांची वित्तीय मंजुरी द्यावी लागली होती. मात्र तरीही कालव्याचे काम बंद होते. त्याबाबत ऍड. काळे यांनी न्यायालयाचे लक्ष वेधून घेतल्यावर सलग दोन दिवस सुनावणी होऊन अकोले तालुक्‍यातील कालव्याचे काम पोलीस संरक्षणात सुरु झाले होते. निधी मात्र सरकारने मंजूर केला नव्हता.
नगर – भाजप आणि शिवसेना यांच्यात युती झाली असली तरी नगर शहरासह शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघात भाजपचा सहभाग जेमतेमच दिसत असून त्यामुळे शिवसेनेचे उमेदवार हवालदिल झाले आहेत. भाजपच्या नेत्यांसह कार्यकर्ते तोंड दाखविण्यापूरतेच दिसत आहे. शिवसेनेच्या मतदारसंघात भाजप हात आखडता घेणार असले तर भाजपच्या वाट्याला आलेल्या मतदारसंघातही शिवसेना ती भूमिका घेईल, असा इशारा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आला आहे.

महायुतीमध्ये नगर जिल्ह्यातील भाजपच्या वाट्याला आठ तर शिवसेनेच्या वाट्याला चार मतदारसंघ आले आहेत. भाजपने सर्वाधिक जागा घेवून शिवसेनेची अधीच अडचण निर्माण केली आहे. त्यात शिवसेनेकडे संगमनेर, नगर शहर, श्रीरामपूर व पारनेर हे चार विधानसभा मतदारसंघ आहे. नगर शहरासह पारनेर व संगमनेरमध्ये भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आहेत. पण हे कार्यकर्ते युतीचा धर्म केवळ वरवर पाळत असल्याचे दिसत आहे. उमेदवार त्यांचे समर्थक दिसताच.

भाजपचे नेते व कार्यकर्ते तोंड दाखवून पुन्हा गायब होत आहे. नगर शहरात शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या सर्वाधिक असली तरी भाजपचे उपनगरात मोठे वर्चस्व आहे. या उपनगरात भाजपचे नगरसेवक आहे. पण ते प्रचारात दिसत नाही. त्यामुळे शहरातील शिवसेनेचा उमेदवार अस्वस्त झाला आहे. ती स्थिती पारनरे, संगमनेर व श्रीरामपूरमध्ये आहे. शिवसेना उमेदवारांच्या प्रचारापासून ही मंडळी दूर आहेत.

पारनेरमध्ये तर विद्यमान शिवसेनेचे आमदार विजय औटी यांच्या विरोधात तिसरी आघाडी करून भाजपकडून बंडखोरीचा प्रयत्न सुरू होता. विशेष म्हणजे त्याला खासदार सुजय विखे यांनी पाठबळ दिले होते. त्यामुळे पारनेरमध्ये बंडखोरी अटळ झाली होती. परंतु थेट मुख्यमंत्र्यांनी लक्ष झातल्यानंतर बंडखोरांना तलवार म्यान करावी लागली. त्यासाठी खा. विखेंची चांगलीच पळपळ झाली.

अर्थात ती केली नसती तर त्यांचे परिणाम देखील भोगावे लागले असते. त्यानंतर भाजपचे नेते व कार्यकर्त्यांनी युतीचा प्रचार करण्याचे ठरविले. पण आ. औटींचा स्वभाव व त्यांच्याकडून नेते व कार्यकर्त्यांनी दिली जाणारी वागणूक पाहता भाजपचे नेते व कार्यकर्ते वरवरच प्रचार करीत आहे. त्यांची ताकद विरोधकांसाठी उपयुक्‍त ठरणार असल्याचे दिसत आहे.
मुंबई : खास महिलांसाठी, महिलांकडून संनियंत्रण करणारी आणि व्यवस्थापनावर भर देणारी 352 ‘सखी मतदार केंद्रे’ राज्यात स्थापन केली जाणार आहेत. प्रत्येक विधानसभा मतदारसंघात किमान एक ते कमाल तीन असे केंद्र उभारले जाईल.
या मतदान केंद्रांमध्ये पोलिसांपासून ते निवडणूक कार्यावरील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह सर्वच महिला असतील.

लैंगिक समानता आणि मतदार प्रक्रियेत महिलांचा अधिकाधिक सकारात्मक सहभाग वाढावा याअनुषंगाने सखी मतदान केंद्रे उभारली जाणार आहेत.

सर्वकाही महिलांकडूनच संनियंत्रित करण्यात येणाऱ्या या मतदान केंद्रांमध्ये कोणताही विशिष्ट रंग वापरला जाणार नाही. या केंद्रांमध्ये काेणत्याही विशिष्ट राजकीय पक्षाच्या रंगाचा अनावश्यक वापर करु नये, असे स्पष्ट निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले आहेत.

या केंद्रात तैनात असलेल्या महिला त्यांच्या आवडीचा कोणत्याही रंगाचा पोशाख परिधान करू शकतात. हे केंद्र अधिकाधिक आकर्षक आणि सुंदर बनविण्यासाठी रांगोळी, रंगरंगोटीसह स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येईल.

अशी केंद्रे निवडताना सुरक्षिततेवर विशेष लक्ष पुरवण्यात येईल. संवेदनशील ठिकाणे टाळून तहसील कार्यालय, पोलीस ठाण्यानजीक अशी केंद्र उभारण्यात येतील. ज्या मतदान केंद्रांवर निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांचा कायम संपर्क राहील, अशा केंद्रांची, सखी मतदान केंद्रांकरिता विशेष निवड करण्यात आली आहे.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget