August 2019
मुंबई : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनी मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.
रायगड जिल्ह्यातून जाणाऱ्या गणेशभक्तांनी पनवेल शहरातील वाहतूक कोंडी टाळण्याकरिता तसेच सुखकर प्रवासाकरिता खालील मार्गांनी प्रवास करावा.

मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबोली-पळस्पे फाटा (एन.एच.48) येथून जाणाऱ्या वाहनांनी कळंबोली-पनवेल बायपास-डी पॉईंट-करंजाळे टोलनाका-पळस्पे फाटा या मार्गाचा वापर करावा. तसेच कळंबोली-वाकण (67.5 कि.मी.) मार्गावरून जाणाऱ्यांनी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-खोपोली-पाली-वाकण या मार्गाचा वापर करावा.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग या भागात गणेशोत्सवादरम्यान सोडण्यात येणाऱ्या जादा बसेस,वाहने व त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी पाहता खालील पर्यायी मार्गाचा अवलंब करावा.

मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबोली-चिपळूण मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-(एनएच-4) सातारा-उंब्रज-पाटण-कोयना नगर-कुंभार्ली घाट-खेर्डी-चिपळूण या मार्गाचा वापर करावा. कळंबोली-हातखंबा मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे-(एनएच 4), सातारा-कराड-वाठार-टोप उजवीकडे वळण घेऊन मलकापूर-शाहुवाडी-आंबा घाट-साखरपा-हातखंबा या रस्त्याने जावे. तसेच कळंबोली-राजापूर मार्गाऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे वरून सातारा-कराड-वाठार-टोप उजवीकडे वळण घेऊन मलकापूर-शाहुवाडी-आंबा घाट-लांजा-राजापूर या मार्गाने जावे.

 कळंबोली-कणकवली या रस्त्याऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वे मार्गे सातारा-कराड-कोल्हापूर शहरातून रंकाळा तलावावरुन-कळे-गगनबावडा घाट-वैभववाडी-कणकवली या रस्त्याचा वापर करावा. सावंतवाडीला जणाऱ्या वाहनांनी कळंबोली-सावंतवाडी ऐवजी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेमार्गे सातारा-कराड-कोल्हापूर-निपाणी-आजरा-आंबोली घाट-सावंतवाडी या रस्त्याचा वापर करावा. महामार्गावर येणाऱ्या अडचणी व इतर मदतीसाठी महामार्ग पोलिसांची वेबसाईटwww.highwaypolice.maharashtra.gov.in तसेच हेल्पलाईन क्रमांक 9833498334 व 9867598675 तसेच संक्षिप्त संदेश सेवेसाठी (SMS)9503211100 व 9503511100 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन वाहतूक पोलीस विभागाने केले आहे.
मुंबई : अमेरिकेचे महाराष्ट्र राज्याशी संबंध अतिशय घनिष्ट असून अमेरिकेतील उद्योग जगतामध्ये हे संबंध आणखी वाढविण्याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. परकीय गुंतवणूकदारांमध्ये महाराष्ट्र सर्वाधिक पसंतीचे राज्य असून भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापाराच्या मोठ्या संधी आहेत. भारताने काही क्षेत्रांमध्ये उद्योगस्नेही धोरणे स्वीकारल्यास गुंतवणुकीच्या संधींना अधिक चालना मिळेल, असे प्रतिपादन अमेरिकेचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत डेव्हिड रांझ यांनी केले.
नुकताच पदभार स्वीकारलेल्या रांझ यांनी आज राज्यपाल चे. विद्यासागर राव यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते.

भारत व अमेरिकेतील संबंध दृढतम असून अमेरिकेने भारताच्या दहशतवादविरोधी भूमिकेला पाठिंबा दिल्याबद्दल राज्यपालांनी समाधान व्यक्त केले. महाराष्ट्र व अमेरिकेमध्ये सहकार्याच्या अमर्याद संधी असून महाराष्ट्रातून फलोत्पादन निर्यातीला देखील मोठा वाव असल्याचे राज्यपालांनी यावेळी सांगितले.
मुंबई : नागरिकांना शुद्ध, पोषक आणि दर्जेदार खाद्यपदार्थ मिळतील यासाठी ‘आहार’ रेस्टॉरंट संघटनेने पुढाकार घ्यावा. राज्यातील रेस्टॉरंट व्यवसायाच्या विकासासाठी शासन कटिबद्ध असून लोकांना दर्जेदार आणि पोषक अन्न मिळण्यासाठी आहार संघटना आणि अन्न-औषध प्रशासन विभागाने समन्वयाने काम करावे, असे आवाहन अन्न आणि औषध प्रशासनमंत्री जयकुमार रावल यांनी येथे केले.
मंत्री श्री. रावल यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात आहार रेस्टॉरंट संघटनेच्या प्रतिनिधींसमवेत बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी अन्न आणि औषध प्रशासन विभागाचे सचिव डॉ. संजय मुखर्जी, आयुक्त डॉ. पल्लवी दराडे, आहार संघटनेचे उपाध्यक्ष निरंजन शेट्टी, सल्लागार अरविंद शेट्टी, सुरेश शेट्टी, शिवानंद शेट्टी, भारतीय अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणच्या उपसमितीचे अध्यक्ष शशिकांत शेट्टी आदी मान्यवर उपस्थित होते.

मंत्री श्री. रावल म्हणाले, शहरातील एकाही रेस्टॉरंटमधील खाद्यपदार्थांमध्ये कीटक किंवा इतर कोणतीही घाण सापडणे योग्य नाही. यामुळे स्थानिक नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम तर होतोच, पण त्याचबरोबर शहराच्या खाद्यसंस्कृतीविषयक प्रतिमेवरही त्याचा विपरित परिणाम होतो. त्यामुळे हे थांबवण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभाग आणि आहार संघटनेने एकत्रित काम करावे. जंक फूड टाळून पोषण आहार घेण्याविषयी शासनाचा अन्न आणि औषध प्रशासन विभाग मोठी जनजागृती करत आहे. यातही आहार संघटनेने सहभाग द्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

खाद्यपदार्थांची गुणवत्ता, रेस्टॉरंट आणि परिसराची स्वच्छता, वेटर, स्वयंपाकी आदी कर्मचाऱ्यांनी घ्यावयाची स्वच्छताविषयक काळजी आदींबाबत रेस्टॉरंट्स,छोटे हॉटेल व्यावसायिक यांच्यासह रस्त्यांवर खाद्यपदार्थ विक्री करणारे विक्रेते यांचेही प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. अन्न आणि औषध प्रशासन विभागामार्फत यासाठी पुढाकार घेण्यात आला असून अशा प्रशिक्षणांची संख्या वाढविण्यात यावी, अशी मागणी यावेळी आहारच्या प्रतिनिधींनी केली. या प्रस्तावास बैठकीत मान्यता देण्यात आली.

अन्नाची गुणवत्ता, रेस्टॉरंट आणि किचनची स्वच्छता, मिळणारी सेवा आदी विविध निकषांच्या आधारे रेस्टॉरंट्सचे मानांकन (ग्रेडींग) होणे गरजेचे आहे, असेही मंत्री श्री. रावल यांनी यावेळी सूचित केले.

आहार संघटनेच्या प्रतिनिधींनी यावेळी मंत्री श्री. रावल यांना निवेदन सादर केले. लोकांना शुद्ध अन्न मिळेल याअनुषंगाने संघटनेच्या विविध मागण्यांची पूर्तता करण्यात येईल, असे मंत्री श्री. रावल यांनी यावेळी सांगितले.

नवी दिल्ली : महाराष्ट्र शासनाच्या वतीने नागपूर येथे उभारण्यात आलेले गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय सुरु करण्याच्या राज्य शासनाच्या प्रस्तावाला आज केंद्रीय वने- पर्यावरण व हवामानबदल मंत्रालयाने मंजुरी दिली आहे.
केंद्रीय वने पर्यावरण व हवामानबदलमंत्री प्रकाश जावडेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज येथे केंद्रीय प्राणीसंग्रहालय प्राधिकरणाच्या बैठकीत ही मान्यता देण्यात आली आहे. नागपूर शहराच्या वायव्येकडे असलेल्या गोरेवाडा तलाव परिसरात महाराष्ट्र शासनाने आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय उभारले आहे. या प्राणी संग्रहालय उभारणीचे काम अंतिम टप्प्यात असून या वर्षाअखेर ते पूर्ण होणार आहे. आजच्या मंजुरीमुळे आता या कामालाही वेग येणार असून पर्यटकांना गोरेवाडा प्राणी संग्रहालय बघण्याची मोठी पर्वणीच उपलब्ध होणार आहे.

वनसंवर्धन कायद्याच्या मंजुरीनंतर डिसेंबर २०१७ मध्ये या प्राणी संग्रहालयाच्या बांधकामास सुरुवात झाली. १० मार्च २०१९ रोजी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने गोरेवाडा प्राणी संग्रहालयाच्या बृहत विकास आराखड्याला मुंजरी दिली होती.

दरम्यान, या प्राणी संग्रहालयात इंडियन सफारी अंतर्गत बिबटे व अस्वल या प्राण्यांच्या सफारीला मंजुरी देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनाने १२ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयाकडे पाठविला होता. या पार्श्वभूमीवर २५ ऑगस्ट २०१९ रोजी केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालयांतर्गत कार्यरत केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष स्थळाला भेट देऊन पाहणी केली होती. या अधिकाऱ्यांनी मंत्रालयाकडे आपला अहवाल सोपवला होता त्यानुसार गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात इंडियन सफारीला मंजुरी मिळाली असून या सफारीच्या माध्यमातून आता पर्यटकांना अस्वल व बिबट जवळून बघता येणार आहेत.

गोरेवाडा प्राणी संग्रहालयातील इंडियन सफारी ११२ हेक्‍टरमध्ये विकसित करण्यात येत आहे. या सफारीमध्ये तृणभक्षक, वाघ, बिबट, अस्वल सफारीचा समावेश असणार आहे. खासगी आणि सार्वजनिक सहभागातून ५६४ हेक्‍टरमध्ये इंडियन, अफ्रि
'राज्य शासन आणि सोशल मीडिया' या विषयावरील सादरीकरणात माहिती संचालक अजय अंबेकर यांची माहिती

मुंबई- दिवसेंदिवस माध्यमांमध्ये वेगवेगळे बदल होत असून सोशल मीडियाचा आवाकादेखील वाढला आहे. शासनाच्या लोककल्याणकारी योजना, उपक्रम, निर्णय जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राज्य शासनाने सोशल मीडियाच्या विविध प्लॅटफॉर्म आणि टूल्सचा अतिशय प्रभावीपणे वापर सुरू केला आहे, अशी माहिती राज्याचे माहिती व जनसंपर्क संचालक अजय अंबेकर यांनी दिली.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सायबर, राज्य मराठी विकास संस्था, आणि पुण्यातील डिजिटल मीडिया प्रेमी मंडळी संस्थेच्या संयुक्त विद्यमाने पहिले राज्यस्तरीय मराठी सोशल मीडिया संमेलन यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आले. त्यामध्ये 'राज्य शासन आणि सोशल मीडियाचा वापर' या विषयावरील सादरीकरणात श्री. अंबेकर बोलत होते.

शासनाच्या विविध लोकोपयोगी योजना, उपक्रम, निर्णय नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय पारंपरिक माध्यमांबरोबरच सोशल मीडियाचाही प्रभावी वापर करीत आहे. यामध्ये ट्विटर, यूट्यूब, फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम, व्हॉट्स अप, एसएमएस. जिओ चॅट चॅनल आदी विविध प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. त्याला मिळणारा प्रतिसादही उत्तम आहे असे श्री. अंबेकर यांनी सांगितले.

सोशल मीडिया व्यतिरिक्त संवादवारी, संवादिनी, माहितीदूत, महामित्रसारख्या उपक्रमांतून चित्ररथ, प्रदर्शन, प्रकाशने, लोककला, पथनाट्य आदींद्वारे लोकांशी थेट संवाद साधला जातो. गणेशोत्सवात 'संवाद पर्व'चे आयोजन केले जाते. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळतो आहे असेही त्यांनी सांगितले.

सामान्य जनतेच्या परिवर्तनात महत्त्वाचे योगदान देणाऱ्या समाज माध्यमांचा सकारात्मक व विधायक कार्यासाठी वापर होणे आवश्यक आहे. या समाज माध्यम वापरकर्त्यांना एकत्र आणून या विषयावर सकारात्मक सर्वांगीण चर्चा घडविण्यासाठी या संमेलनाचे आयोजन करण्यात आल्याचे शेवटी श्री. अंबेकर यांनी सांगितले.

सांगली : जिल्ह्यात पूरबाधित 18 हजार 923 कुटुंबाना गहू, तांदूळ आणि केरोसीनचे वितरित करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी वसुंधरा बारवे यांनी दिली.

 यामध्ये मिरज तालुक्यातील 6 हजार 152 कुटुंबाना 615.2क्विंटल गहू व तितकेच तांदूळ व 3975 लिटर केरोसिन, महानगरपालिका क्षेत्रात2971 कुटुंबाना 297.1 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ, वाळवा तालुक्यातील4297 कुटुंबाना 429.7 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ, व 4390 लिटर केरोसिन,शिराळा तालुक्यातील 575 कुटुंबाना 57.5 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ, आणि पलूस तालुक्यात 4928 कुटुंबानां 492.2 क्विंटल गहू व तितकेच तांदूळ आणि 90लिटर केरोसिन वितरित करण्यात आले आहे.
राज्यस्तरीय पहिल्या मराठी समाज माध्यम संमेलनाचा समारोप;
सोशल मीडियाशी संबंधित विविध विषयांची उपस्थितांना मेजवानी

मुंबई - सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून तुमची छोटीशी चूकही महागात पडू शकते. केवळ दुसरा करतोय म्हणून कोणतीही गोष्ट करू नका,असे कळकळीचे आवाहन आज सोशल मीडिया संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी विविध तज्ज्ञांनी केले. दरम्यान, आज दुसऱ्या दिवशीदेखील या संमेलनाला नेटकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सोशल मीडिया, ब्रँड, व्यावसायिक दृष्टिकोन आणि वापर, व्हायरल होणाऱ्या गोष्टी, सोशल मीडियामुळे वाटणाऱ्या चिंता त्यावरील उपाय, टूल्स आणि टेक्निक आदी विविध विषयांची मेजवानी आज या सम्मेलनाद्वारे उपस्थितांना मिळाली.


'व्हायरल होतं, का करता पण येतं?' या परिसंवादात प्रसिद्ध पत्रलेखक अरविंद जगताप, गणेश मतकरी, अमोल देशमुख, संजय श्रीधर, पंकज जैन यांनी सहभाग घेतला. कन्टेन्ट चांगले असेल तर ऑटोमॅटिक व्हायरल होते मात्र नकारात्मक गोष्टी लवकर व्हायरल होतात. सोशल मीडिया हे दुधारी शस्त्र असून तुमची छोटीशी चूकही महागात पडू शकते असा सूर या परिसंवादात उमटला.

'ब्रँड, व्यावसायिक दृष्टिकोन आणि सोशल मीडिया' यावरील परिसंवादात सेटको इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश मंडलिक, ब्रँड व्यावसायिक सदानंद परूळेकर, रूरल मार्केटिंग तज्ञ प्रदीप लोखंडे आणि इ- लर्निंग, इ- गव्हर्नन्स तज्ञ दिलीप टिकले. विनायक गोडसे यांनी सहभाग घेतला. टार्गेट ऑडियन्स पाहून ब्रँड ठरवला जायचा, मात्र सोशल मीडियामुळे सगळं एकच झालं असे सांगून ग्राहक आणि मालक यांच्यात समाज माध्यमामुळे बॉंडिंग तयार झाल्याचं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं.

'सोशल मीडियावर व्यावसायिक यश कसं मिळवायचं?' या विषयावरील परिसंवादात इन मराठीचे ओंकार दाभाडकर, मधुरा रेसिपीजच्या मधुरा बाचल,कोलाज इनचे सचिन परब, भाडीपाच्या संस्थापक अनुषा नंदकुमार यांचा सहभाग होता.

सोशल मीडियावर वापरण्यात येणाऱ्या प्रादेशिक भाषांमध्ये मराठी तिसऱ्या क्रमांकावर आहे, डिजिटल मीडियावर जाहिरातीद्वारे पैसे कमवू शकतो मात्र पैसे कमावण्यापेक्षा प्रामाणिकपणे त्या व्यवसायात टिकून राहण्याची गरज तज्ज्ञांनी यावेळी व्यक्त केली.

सोशल मीडियासाठी बोलीभाषा आवश्यक आहेत मात्र शब्दच्छल होऊ नये,नियमांचा भंग होऊ यासाठी प्रमाणभाषेची आवश्यकता आहे असा सूर 'सोशल मीडियाची भाषा : प्रमाण भाषा की....' या परिसंवादात उमटला. या परिसंवादात माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे संचालक अजय अंबेकर, बीबीसी मराठीचे मयुरेश कोन्नूर, बोलभिडूचे संस्थापक सौरभ पाटील, राज्य मराठी विकास संस्थेचे आनंद काटीकर यांनी सहभाग घेतला.

'मला व्यक्त होताना असणाऱ्या चिंता, त्यावरील उपाय आणि माझ्या अपेक्षा' या विषयावरील परिसंवादास उपस्थित प्रसाद शिरगांवकर, मराठी संगीतकार कौशल इनामदार, सेटको इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक राजेश मंडलिक, सोशल मीडिया लेखिका गौरी ब्रह्मे, भाडिपाचे सारंग साठे यांनी सहभाग घेतला.

माध्यमांची आचारसंहिता पाळून आपण व्यक्त होणं आवश्यक असून सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या भाषेबद्दल तारतम्य पाळले गेले पाहिजे अशी अपेक्षा या परिसंवादातून व्यक्त करण्यात आली.

'सोशल मीडियामुळे मिळालेले नाविन्यपूर्ण कलाविष्कार आणि संधी' या परिसंवादात बाबा मिमवाले उर्फ सनत लडकत, बुकलेट गाय अमृत देशमुख आणि रॅप बॉस म्युझिक ग्रुपचे अजित शेळके यांनी सोशल मीडियावरील नावीन्यपूर्ण कलाविष्काराची उपस्थितांना माहिती दिली. अजित शेळके यांनी त्यांच्या रॅप साँगचे सादरीकरणही केले.यावेळी 'गावाकडच्या गोष्टी' या गाजलेल्या वेब सीरीजमधील कलाकारांनी सादरीकरण केले. तसेच 'गुगल विरूद्ध अलेक्सा' या प्रसाद शिरगावकर लिखित लघुनाट्याचे सादरीकरण झाले. व्यक्त होणे अजून सोपे करण्यासाठी टूल्स आणि टेक्निक्स यावर स्वरचक्र टंकलेखन निर्माता अनिरुद्ध जोशी यांनी विविध टेक्निक्स उपस्थितांना समजावून सांगितल्या.

राज्यात पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या समाजमाध्यम संमेलनाच्या अभिनव उपक्रमाला सलग दुसऱ्या दिवशीही उपस्थितांचा तसेच फेसबुक लाईव्हद्वारे नेटकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीचा दिड महिन्यात अहवाल

मुंबई  – देशाच्या कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी शेती क्षेत्राची उत्पादकता, विपणन आणि कृषीमालाच्या निर्यातीला प्रोत्साहन देण्यावर भर देणारा समितीचा अहवाल येत्या दीड महिन्यात अंतिम करून तो पंतप्रधानांना सादर करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली. अहवालाच्या माध्यमातून देशातील कृषीक्षेत्रात आमुलाग्र बदल करण्यासाठी हा अहवाल एक आश्वासक पाऊल ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

कृषी क्षेत्रात परिवर्तन करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आलेल्या मुख्यमंत्र्यांच्या उच्चाधिकार समितीची दुसरी बैठक आज येथील सह्याद्री अतिथीगृह येथे झाली. केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी, पंजाबचे वित्तमंत्री मनप्रितसिंग बादल, उत्तर प्रदेशचे कृषिमंत्री सूर्य प्रताप साही, ओरीसाचे कृषिमंत्री अरूण कुमार साहू उपस्थित होते.

बाजार समितीच्या कायद्यामध्ये सुधारणा, करार शेती, शेतीत नवीन तंत्रज्ञान, जीवनाश्‍यक वस्तू कायद्यातून कृषी उत्पादनांना वगळणे, ई-नाम, कृषी निर्यात आदी विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. बैठकीनंतर मुख्यमंत्री पत्रकारांशी बोलत होते.

शेती क्षेत्राची उत्पादकता, विपणन आणि कृषीमालाची निर्यात या बाबींवर अधिक लक्ष केंद्रीत करुन समिती आपला अंतिम अहवाल पंतप्रधानांकडे सादर करेल.

तसेच देशाच्या कृषी क्षेत्रात नवनवीन तंत्रज्ञान आणण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगतानाच पीक पद्धतीत बदल करतानाचा कृषी मालाच्या सहाय्याने इंधन तयार करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहीत करून त्यातून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

बाजार समिती कायद्यात सुधारणा करून शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा यासाठी केंद्र सरकारने मॉडेल ऍक्‍ट तयार केला आहे. राज्यांनी तो स्वीकारण्याबाबत बैठकीत चर्चा झाली. जीवनावश्‍यक वस्तू कायद्यातून कृषी क्षेत्राशी संबंधित कुठल्या बाबी वगळल्या जेणे करून कृषीमालाच्या किंमती घसरणार नाहीत यावर चर्चा करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. कृषी मालाची निर्यात वाढविण्यावर जास्त भर देण्यात येत आहे. त्यासाठी “अपेडा’ यासंस्थेच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे.

शेती आणि वाणिज्य एकत्रित करून शेतमालाला जागतिक बाजारपेठ “अपेडा’च्या माध्यमातून मिळवून देण्यावर बैठकीत भर देण्यात आला. किटकनाशक रहीत पीक क्षेत्र घोषीत करणे, सेंद्रीय शेतीच्या उत्पादनांसाठी मानके तयार करणे तसेच अन्य राज्यांनी कृषीक्षेत्रात ज्या सुधारणा केल्या आहे. त्यातील काहींचा अंगिकार करून संपूर्ण देशासाठी लागू करण्याबाबत चर्चा झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.श्रीनगर : जम्मू आणि काश्‍मीरमध्ये आज सकाळपासून मोबाईल फोनची सेवा सुरू करण्यात आली आहे. तर जम्मूमध्ये देखील टूजीच्या स्पीडमधील इंटरनेट सेवा सुरू झाली आहे. राज्यातील विविध निर्बंध टप्प्याटप्प्याने हटवले जात असून सध्या जनजीवन सुरळित होण्याच्या मार्गावर आहे. कलम 370 रद्द केल्यानंतर राज्यातील काही भागात जमावबंदीच्या कलमासह मोबाईल, इंटरनेटची सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यान, हेच निर्बंध आता शिथिल करण्यात येत आहेत.

जम्मू-काश्‍मीरमधील सांबा, कठुआ, उधमपुरमध्ये टुजीच्या स्पीडमध्ये इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यात 5 ऑगस्टपासून इंटरनेट सेवा बंद होती. कलम 370 रद्द केल्यानंतर सावधानता म्हणून फोन आणि इंटरनेट सुविधा बंद करण्यात आली होती. तसेच आता राज्यातील शाळा आणि महाविद्यालये सोमवारपासून उघडण्याचे आदेश देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहे. मागील 12 दिवसांपासून राज्यातील संचार सेवा बंद होती तसेच सतर्कता म्हणून शाळा, महाविद्यालयेदेखील बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान, परिस्थिती जशी निवळेल तसे हे निर्बंध हटवण्यात येतील असे यापुर्वीच राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी म्हटले होते.


कोल्हापूर – महापुराने होत्याचे नव्हते झाले असून तुम्ही एकटे नसून तुमच्या मागे सर्व महाराष्ट्र उभा आहे’, असा दिलासा माजी केंद्रीय कृषी मंत्री, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी येथे दिला. तसेच नुकसान झालेल्या पूरग्रस्तांना पुन्हा उभे करण्यासाठी कर्जमाफीसह आर्थिक मदतीचीही मागणी केंद्र व राज्य सरकारकडे करू, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

पवार यांनी पूरबाधित असलेल्या करवीर तालुक्‍यातील चिखली, आंबेवाडी, वरणगे पाडळी या गावांसह शहरातील शाहुपुरी कुंभार गल्ली, बापट कॅंप येथील पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या भावना जाणून घेतल्या. यावेळी आमदार हसन मुश्रीफ, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार धनंजय महाडिक, पी. एन. पाटील उपस्थित होते.


नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताचा शेजारील देश भुतानच्या दोन दिवसीय दौऱ्यावर रवाना झाले आहेत. आज सकाळीच पंतप्रधान या दौऱ्यासाठी रवाना झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दुसरा भुतान दौरा आहे. तर दुसऱ्यांदा पंतप्रधानपदी आल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच दौरा आहे.भुतानमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. या दौऱ्यात पंतप्रधान मोदी दोन्ही देशांमध्ये शिक्षण विषयक 10 करारांवर स्वाक्षरी करणार आहेत. तसेच मोदींच्या हस्ते इथे काही ठिकाणी उद्घाटनाचे कार्यक्रमही पार पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मोदींच्या या दोन दिवसीय दौऱ्यात 17 तारखेला ताशिचोडजोंगला त्यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात येणार आहे. याच दिवशी भुतानचे राजा जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांची भेट घेणार आहेत. तसेच भुतानचे चौथे राजा जिग्मे सिंगे वांगचुक यांचीइदेखील मोदी भेट घेणार आहेत. दरम्यान, या दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन्ही देशांच्या विकासाच्या मुद्यावर चर्चा करणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना देखील मार्गदर्शन करणार असल्याची शक्‍यता वर्तवण्यात येत आहे.


मुंबई : टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा रवी शास्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ‘क्रिकेट सल्लागार समिती (CAC)’ ने रवी शास्त्री यांची नियुक्ती केली असून ते 2021 पर्यंत भारतीय संघाचे प्रशिक्षक म्हणून काम पाहणार आहेत. माजी कर्णधार कपिल देव हे सीएसीचे प्रमुख आहे. या समितीत कपिल देव यांच्या व्यतिरिक्त माजी खेळाडू अंशुमन गायकवाड आणि शांता रंगास्वामी यांचाही समावेश आहे. या त्रिसदस्यी समितीने रवी शास्त्री यांची निवड केली आहे.

टीम इंडियाच्या प्रमुख प्रशिक्षकपदासाठी अंतिम सहा नावं शार्टलिस्ट करण्यात आली होती. या सहा जणांना शुक्रवारी मुंबईतील बीसीसीआयच्या हेडक्वॉटरमध्ये बोलवण्यात आले होते. त्यावेळी या सर्व उमेदवारांचे प्रेझेंटेशन आणि मुलाखती या समितीच्या समोर पार पडल्या. त्यानंतर सीएसी समितीने टीम इंडियाच्या प्रशिक्षकाचे नाव जाहीर केले.
कोल्हापूर  : अर्थ मुव्हींग काँट्रॅक्टर्स अँड मशिनरी ओनर्स असोसिएशन, अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स ग्रुप च्या माध्यमातून पशुसंवर्धन विभागाने आज अखेर 87 म्हैशी, 72 गायी, 19 वासरे आणि 51 शेळी-मेंढी या मृत जनावरांची शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट लावली आहे.

अर्थमुव्हींग काँट्रॅक्टर्स अँड मशिनरी ओनर्स असोशिएशनचे अध्यक्ष रवींद्र पाटील-सडोलीकर, सचिव रंगराव पाटील यांनी याबाबत माहिती दिली. रेडेडोह परिसर, चिखली, वडंणगे, अंबेगाव परिसरातील रस्त्यांवर आणि गावांमध्ये मृत जनावरे पडलेली होती. आज जेसीबीच्या माध्यमातून खड्डे खोदून ब्लिचिंग पावडर, कार्बोलिक ॲसिडच्या वापर करुन या मृत जनावरांची शास्त्रीयदृष्ट्या विल्हेवाट लावण्यात आली. दुर्गंधी पसरु नये म्हणून गॅमेग्झिंन पावडर फवारण्यात आली.

तसेच जाधववाडी येथील महाविरणच्या जंक्शन मधील पाणी काढण्यासाठी तसेच शहरातील अन्य ठिकाणच्या पाणी उपसा करण्यासाठी 30 पंप्स दिले आहेत. 4 डंपर, 15 ट्रॅक्टर, 4 जेसीबी या कामासाठी उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. त्याशिवाय टँकरद्वारे पीण्याचे पाणीही वाटण्यात आल्याचे ते म्हणाले.

अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स ग्रुपच्या माध्यमातून मृत जनावरांची शास्त्रीय विल्हेवाट लावण्याबाबत संदेश व्हॉटसॲपवर पोस्ट करण्यात आल्याचे सांगून किशोर शहा म्हणाले, 3 ट्रक कोरडा चारा गोळा करुन शहर परिसरात तसेच आरे, वरणगे पाडळी, बस्तवाड आदी ठिकाणी पाठवण्यात आला आहे. आज अंबेवाडी रस्त्याकडेला आढळून आलेली मृत जनावरे जेसीबीने खड्डा खोदून ब्लिचिंग पावडर, कार्बोलिक ॲसिडच्या वापर करुन या मृत जनावरांची शास्त्रीय दृष्ट्या विल्हेवाट लावण्यात आली. दुर्गंधी पसरु नये म्हणून गॅमेग्झिंन पावडर फवारण्यात आली.

याबाबत पशुसंवर्धनचे उपायुक्त डॉ. वाय.ए.पठाण आणि जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद पवार यांनी माहिती दिली. आजअखेर मृत 87 म्हैशी, 72 गायी, 19 वासरे आणि 51 शेळा-मेंढ्या यांची शास्त्रीय दृष्ट्या विल्हेवाट लावण्यात आली आहे. यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आणि शासनाच्या माध्यमातून ब्लिचिंग पावडर, कार्बोलिक ॲसिड, गॅमेग्झिंग पावडर पुरवण्यात आली आहे. गोठे धुण्यासाठी धुण्याचा सोडा, फिनेल आले असून त्याचे वाटपही सुरु करण्यात येत आहे. त्याचबरोबर आजरा येथील 3500, भुदरगडमधील 5800 आणि हातकणंगलेमध्ये 3281 कोंबड्यांची विल्हेवाटही संबंधित ग्रामस्थांनी लावली आहे.
नवी दिल्ली : वायुदल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी आज शौर्य पदक जाहीर झाले असून यात महाराष्ट्राच्या 11 जणांचा समावेश आहे. प्रकाश जाधव यांना मानाचा किर्ती चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे.
तिन्ही सेना दलाचे प्रमुख या नात्याने राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज वायुदल, नौदल आणि लष्कर तसेच सशस्त्र सेनेच्या एकूण 132 सेनाधिकारी व जवानांना उल्लेखनीय सेवेसाठी शौर्य पदक मंजूर केले आहेत. या पदकांमध्ये दोन किर्ती चक्र, एक वीर चक्र, 14 शौर्य चक्र, 8 बार टू सेना मेडल (शौर्य), 90 सेनापदक(शौर्य), 5 नौसेना पदक(शौर्य),7 वायुसेना पदक (शौर्य), 5 युध्दसेवा पदक तसेच ऑपरेशन अनंतनागसाठी एका पदकांचा समावेश आहे.

प्रकाश जाधव यांना ‘किर्ती चक्र’

महाराष्ट्राचे सुपुत्र लष्कराचे जवान प्रकाश जाधव यांना मानाचा किर्ती चक्र पुरस्कार जाहीर झाला आहे. श्री. जाधव हे लष्कराच्या कॉर्प्स ऑफ इंजिनीअर-फर्स्ट बटालियन ऑफ राष्ट्रीय रायफलचे जवान आहेत.

दोघांना ‘शौर्य चक्र’
लष्कराचे अधिकारी कॅप्टन महेश कुमार भुरे आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाचे कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर साबळे यांना शौर्य चक्र जाहीर झाले.

दोन : ‘बार टू सेना मेडल’
मेजर सागर प्रकाश परदेशी यांना ‘बार टू सेना मेडल’ जाहीर झाले आहे. तसेच, मेजर कौस्तुभ राणे यांना मरणोत्तर ‘बार टू सेना मेडल’ जाहीर झाले आहे.

तिघांना सेना पदक
अतुलनीय शौर्यासाठी मेजर आनंद पठारकर , मेजर वैभव जवलकर आणि कॅप्टन प्रतीक रांजनगावकर यांना सेना पदक जाहीर करण्यात आले आहे.

दोन : वायुसेना पदक
भारतीय वायुसेनेचे अधिकारी ग्रुप कॅप्टन सौमित्र तामसकर आणि स्कॉड्रन लिडर पंकज भुजाळे यांना वायुसेना पदक जाहीर झाले आहे.

एअर कमोडोर सुनिल विधाते यांना ‘युध्दसेवा पदक’ तर तटरक्ष दलाचे इंस्पेक्टर जनरल मनीष पाठक यांना उत्कृष्ट सेवेसाठी ‘तटरक्षक पदक’ जाहीर झाले आहे.
कोल्हापूर : जिल्ह्यातील महापूर आता हळूहळू ओसरु लागला असून पूरग्रस्त भागात आरोग्य आणि स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे अशी माहिती सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिली.
आरोग्य विभागाच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांसाठी येथील सेवा रुग्णालयात आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरात सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते. यावेळी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके, संपर्क प्रमुख अरुण दूधवडकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी.सी. केंम्पीपाटील, सेवा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ. कदम यांच्यासह अनेक मान्यवर तसेच पत्रकार व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्ह्यावर यंदा महापुराचं मोठं संकट आलं. या महापुराचा सामना करण्यासाठी शासन आणि प्रशासन कटिबध्द आहे, असे स्पष्ट करुन आरोग्य मंत्री श्री. शिंदे म्हणाले, पुराच्या पहिल्या दिवसापासून राज्याचा आरोग्य विभाग कार्यरत ठेवला आहे. आरोग्य विभागातील सर्व अधिकारी/कर्मचाऱ्यांना पूर परिस्थितीत पुरग्रस्तांना आरोग्य सेवा तात्काळ पुरविण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार पुरग्रस्तांच्या स्थलांतरीत ठिकाणी आरोग्य विभागाची वैद्यकीय पथके तैनात केली. आता पूर ओसरु लागला आहे. त्यामुळे पूरग्रस्त भागात साथीचा तसेच अन्य जलजन्‍य व कीटकजन्य आजारांचा उद्रेक होणार नाही, यासाठीही आरोग्य यंत्रणा कटिबध्द आहे.

पूरग्रस्त भागात दलदल, चिखल, कचरा आदीमुळे दुर्गधी आणि आजार उद्भवण्याची शक्यता असल्याने पुरग्रस्त भागात आरोग्य यंत्रणा, स्वयंसेवी , सेवाभावी संस्थांबरोबरच सक्रीय असून आवश्यक असणारी डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी- स्टाफ उपलब्ध करुन दिला आहे. तसेच पुरग्रस्तांनसाठी औषधे, पुरेशी लसीची मात्रा उपलब्ध करुन दिली आहे. पुरग्रस्तांची आरोग्य आणि स्वच्छतेची काळजी घेण्यास आरोग्य विभाग सज्ज असून साथीच्या आजाराबाबत प्रतिबंधक उपाययोजना राबविण्याबरोबरच आरोग्य शिक्षणावरही आणि सर्वेक्षणावर अधिक भर दिला असल्याचेही आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे सांगितले.

कोल्हापूर जिल्ह्यातील पुरपरिसिथतीच्या सुरवातीपासून आपण व्यक्तिश: लक्ष केंद्रीत केले असून पुरग्रस्तांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज ठेवली. संक्रमण शिबीरातील तसेच स्थलांतरीत पुरग्रस्तांची भेट घेवून त्यांना आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. संक्रण शिबीरामध्ये तसेच गावागावांत वैद्यकीय पथके सुरुवातीपासून तैनात केली असल्याचे सांगून आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, कोल्हापूरातील पुराच्या पार्श्वभूमीवर मुंबई, ठाणे येथूनही विशेष वैद्यकीय पथके कार्यरत ठेवली. तसेच मोठ्या प्रमाणावर औषधांचा पुरवठा केला. याकामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे यांच्या संपर्कात राहून त्यांच्या मार्गदर्शनानुसार पुरग्रस्तांसाठी आरोग्य यंत्रणा तैनात केली.

पूरग्रस्तांसाठी आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्यासाठी राज्याचा आरोग्य विभाग कटिबध्द असल्याचे सांगून आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, पुरग्रस्तांसाठी आरोग्य आणि स्वच्छतेमध्ये शासन कसूभरही शासन कमी पडणार नाही. आरोग्य विभागाच्या सचिव ते संचालकापासून सर्व यंत्रणा पुरग्रस्तांसाठी सक्रीय केली आहे. कोणत्याही परिस्थिती साथीच्या आजारामुळे एकही रुग्ण दगावणार नाही याची खबरदारी आरोग्य विभागाने घेतली आहे. जनतेनेही साथीच्या आजाराबाबत दक्षता घेवून आरोग्य विभागास सहकार्य करावे असे आवाहनही त्यांनी केले.
केंद्रीय कौशल्य विकास, उद्योजकता मंत्र्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

मुंबई : कौशल्य विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण अशी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स ही संस्था मुंबईत स्थापन करण्यात येणार आहे. ही बाब महाराष्ट्रासाठी गौरवास्पद आणि स्वागतार्ह असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
केंद्रीय कौशल्य विकास आणि उद्योजकतामंत्री महेंद्र नाथ पांडे यांनी मुख्यमंत्री श्री.फडणवीस यांची आज सह्याद्री राज्य अतिथी गृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री.फडणवीस बोलत होते.

यावेळी केंद्रीय मंत्री श्री.पांडे यांनी कौशल्य विकासाच्या धोरणाबाबत माहिती दिली, तसेच विविध विषयांवर चर्चा केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात मुंबई, अहमदाबाद आणि कानपूर येथे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्किल्स स्थापन करण्यात येत आहेत. मुंबईतील संस्थेच्या स्थापनेत टाटा ट्रस्टने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र हे कौशल्य विकास क्षेत्रातील आघाडीचे राज्य आहे. यंदा रशियामधील काझन येथे वर्ल्ड स्किल्स स्पर्धा होणार आहे. त्यामध्ये देशभरातून ४८ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये महाराष्ट्रातील सात विद्यार्थ्यांचा समावेश आहे. मुंबईतील संस्थेचा पायाभरणी समारंभ लवकरच प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, कौशल्य विकासाच्या दृष्टीने मंत्रिमंडळानेही अलीकडेच महत्त्वपूर्ण असे निर्णय घेतले आहेत. राज्यातील विविध योजनांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न आहे. या प्रयत्नात ही महत्त्वपूर्ण संस्था सुरु होणे महाराष्ट्राच्या दृष्टीने गौरवास्पद अशी बाब आहे.

यावेळी केंद्रीय कौशल्य विकास विभागाचे महासंचालक (प्रशिक्षण) राजेश अगरवाल आदी उपस्थित होते.
पुणे : कोल्हापूर व सांगली येथील पूरस्थिती निवळत असून पुनर्वसनाच्या दृष्टीने वेगवेगळ्या विभागाची पथके अहोरात्र काम करीत आहेत. पुरामुळे मृत झालेल्या व्यक्तींची संख्य 50 एवढी झाली असून शक्य तितक्या लवकर जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा आमचा प्रयत्न आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी आज दिली.

आजही आपण सर्व यंत्रणेच्या प्रमुख अधिकाऱ्यांशी चर्चा करून सुरू असलेल्या कामाचा आढावा घेतला. काम मोठे असले तरी सर्वांना विश्वासात घेऊन यंत्रणा काम करीत आहे, असे स्पष्ट करून डॉ. म्हैसेकर यांनी खालीलप्रमाणे अधिक माहिती दिली.

पर्जन्यमान

सांगली जिल्ह्यामध्ये आजअखेर एकूण 539.86 मि.मी.इतका पाऊस झालेला असून आजअखेरच्या सरासरी पर्जन्यमानाची तुलना करता 217.66% इतका पाऊस पडला आहे.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आजअखेर झालेला पाऊस 1663.71 मि.मी झालेला असून आजअखेरच्या सरासरी पर्जन्यमानाची तुलना करता 126.90% इतका पाऊस पडला आहे

महत्त्वाच्या स्थळातील पाण्याची पातळी

आयर्विन पूल :- येथील धोका पातळी 45’00” आहे. ती आज दुपारी 4 वाजेपर्यंत 39’01” इतकी आहे.
राजाराम बंधारा :- येथील धोका पातळी 43’00” आहे. ती आज दुपारी 4 वाजेपर्यंत 41’6” आहे.

स्थानांतरित कुटुंब / व्यक्ती माहिती

सांगली जिल्ह्यामध्ये 4 तालुक्यातील 104 गावे बाधित झाली असून यामधील 69067 कुटुंबातील 3,11,220 व्यक्ती सध्यास्थानांतरित आहेत. या स्थानांतरित व्यक्तीसाठी आज एकूण 138 तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 12 तालुक्यातील 321 गावे पुरामुळे बाधित झालेली असून स्थानांतरित व्यक्तींची संख्या 3,58,091 इतकी आहे व त्यांच्या साठी 224 तात्पुरते निवारा केंद्र सुरु आहे.

पुरामुळे वेढलेली गावे

सांगली जिल्ह्यामध्ये मिरज व वाळवा या 2 तालुक्यातील एकूण 3 गावांचा संपर्क तुटला असून या गावातील एकूण 4510 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलेले आहे.


कोल्हापूरमध्ये ‍शिरोळ, गगनबावडा, करवीर व हातकणंगले या 4 तालुक्यातील एकूण 16 गावांचा संपर्क तुटल्याने यामधील 47, 401 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

पुरामुळे मयत :-

पुणे विभागातील 5 जिल्ह्यांतील एकूण 50 व्यक्ती मृत पावल्या असून बेपत्ता व्यक्तींची संख्या 3 इतकी आहे. यामध्ये सांगली जिल्ह्यातील 24, कोल्हापूरमधील 10, सातारामधील 8, पुणेमधील 7 आणि सोलापूरमधील 1 मयत व्यक्तींचा समावेश आहे. तरसांगली व कोल्हापूर जिल्हयातील अनुक्रमे 1 व 2 व्यक्ती बेपत्ता आहेत.

मृत पावलेली जनावरे

पुणे विभागात पुराच्या तडाख्यात गाय व म्हैस वर्गीय 7847 जनावरे, 1065 शेळया-मेंढया तर 166 लहान वासरे व गाढवांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हयात 4350 गाय व म्हैस वर्गीय जनावरे, 500 शेळया-मेंढया, 80 लहान वासरे व गाढवांचा समावेश आहे.

कोल्हापूर जिल्हयात 3420 गाय व म्हैस वर्गीय जनावरे, 300 शेळया-मेंढया, 50 लहान वासरे व गाढवांचा समावेश आहे.

पुणे जिल्ह्यात 60 गाई व म्हैस वर्गीय जनावरे, 250 शेळया-मेंढया, तर 30 लहान वासरे व गाढवांचा समावेश आहे.

सातारा जिल्ह्यात 17 गाय व म्हैसवर्गीय जनावरे, 15 शेळया-मेंढया तर 6 लहान वासरे व गाढवांचा समावेश आहे.

घरांची पडझड :-दिनांक 13/8/2019 पर्यंत

सांगली जिल्हयामध्ये पूर्णत :पडझड झालेल्या घरांची संख्या 11 असून या व्यतिरिक्त 1350 घरांची अंशत : पडझड झालेली आहे.

कोल्हापूर मध्ये पूर्णत : पडझड झालेल्या घरांची संख्या 496 असून या व्यतिरिक्त 8478 घरांची अंशत: पडझड झालेली आहे. तसेच 316 गोठयाची पण पडझड झाली आहे.

मदत व बचाव कार्य :-

सांगली जिल्ह्यामध्ये NDRF यांची एकूण 8 पथके कार्यरत आहेत. बचाव कार्यासाठी 20 बोटी व 176 जवान कार्यरत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यामध्ये NDRF, SDRF व NAVY यांची एकूण 18 पथके व 68 बोटी व 388 जवान कार्यरत आहेत.

वैद्यकीय पथके :-

सांगली जिल्हयामध्ये 107, कोल्हापूर मध्ये 150 व सातारा जिल्हयामध्ये 72 असे एकूण 329 वैद्यकीय पथके सध्या कार्यरत आहेत.

सहाय्यता निधी व मदत वाटप :-

मुख्यमंत्री सहायता निधी करीता पुणे विभागीय आयुक्त कार्यालय मध्ये आतापर्यंत व्यक्ती/संस्था यांनी एकूण 6,25,000 इतक्या रकमेचे धनादेश सूपुर्त केले आहेत.

या व्यतिरिक्त कपडे, बिस्कीट पाकीटे, पाण्याच्या बॉटल, दुध पावडर पाकीटे, मेणबत्त्या, सोलार लाईट व तातडीच्या उपचारासाठी आवश्यक औषधे इत्यादी विविध स्वरुपामध्ये मदत विभागीय आयुक्त कार्यालयास प्राप्त होत आहे.

आजपर्यंत सांगलीसाठी 43 ट्रक व कोल्हापूरसाठी 40 ट्रक असे एकूण 83 ट्रकद्वारे साहित्य पोहचविण्यात आलेले आहे.

महावितरण :- दिनांक 13/8/2019 पर्यंत

सांगली जिल्हयातील 10 - उपकेद्र, 1400 - टान्सफॉर्मर व 86115 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरु केला आहे.

तसेच कोल्हापूर जिल्हयातील 24 - उपकेंद्र, 2886- टान्सफॉर्मर व 1,88,699 ग्राहकांचा विद्युत पुरवठा सुरु केला आहे.

कोल्हापूर व सांगली जिल्हयातील विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी पुणे, बारामती व सातारा येथून 48 पथके कोल्हापूर येथे व 12 पथके सांगली येथे कार्यरत आहेत. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी लागणारे साहित्य पुरेशा प्रमाणात उपलब्धकेलेले आहे.

बँकीग सेवा :-

सांगली जिल्हयातील एकूण 329 एटीएम पैकी 209 एटीएम सुरु करणेत आले आहेत. तथापि, 120 एटीएम अद्यापही बंद आहेत.

कोल्हापूर जिल्हयातील एकूण 647 एटीएम पैकी 390 एटीएम सुरु करणेत आले आहेत. तथापि, 257 एटीएम अद्यापही बंद आहेत.

बंद पुल व बंद रस्त्यांची माहिती :-

सांगली जिल्हयामध्ये एकुण 23 रस्ते बंद आहेत. तसेच पुराच्या पाण्यामुळे 13 पुलावरील वाहतूक सुध्दा बंद आहे.

कोल्हापूर जिल्हयामध्ये एकुण 37 रस्ते बंद आहेत. तसेच पुराच्या पाण्यामुळे 13 पुलावरील वाहतूक सुध्दा बंद आहे.

एस. टी. वाहतूक :-

सांगली जिल्हयामध्ये अद्यापही 30 मार्ग बंद आहेत. कोल्हापूर जिल्हयातील अद्यापही 8 मार्ग बंद आहेत.
4417 कुटुंबांना 2 कोटी 20 लाख 85 हजार सानुग्रह वाटप- जिल्हाधिकारी दौलत देसाई

कोल्हापूर : अतिवृष्टीमध्ये जिल्ह्यातील मयत झालेल्या चौघाजणांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयांची मदत आज करण्यात आली. त्याचबरोबर आजअखेर जिल्ह्यातील 4417 पूरग्रस्त कुटुंबांना प्रत्येकी 5 हजार अशी 2 कोटी 20 लाख 85 हजार सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
अतिवृष्टीमध्ये चंदगड तालुक्यातील हलकर्णी गावचे जिजाबाई सतुप्पा कडुकट (वय 55) यांचा तसेच आजरा तालुक्यातील इटे गावचे केशव बाळू पाटील (वय 55) यांचा 6 ऑगस्ट रोजी, गडहिंग्लज तालुक्यातील कडलगे गावचे चिंतामणी मारुती कांबळे (वय 45) यांचा 12 ऑगस्ट रोजी आणि पन्हाळा तालुक्यातील पिंपळे तर्फ सातवे येथील तानाजी पाडुरंग पोवार (वय 35) यांचा 9 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला होता. यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 4 लाख रुपयाची मदत आज देण्यात आली.

पूरग्रस्त कुटुंबांना ग्रामीण भागात 10 हजार आणि शहरी भागात 15 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येत आहे. त्यापैकी 5 हजार रुपयांचा रोख वाटप कालपासून करण्यात आले. यात ग्रामीण भागातील 4130 आणि शहरी भागातील 287 अशा एकूण 4417 कुटुंबांना 2 कोटी 20 लाख 85 हजार रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरित कुटुंबांनाही अनुदान वाटप सुरु आहे.

कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड खात्यात मदत करावी
जिल्ह्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी कोल्हापूर डिझास्टर रिलिफ फंड या नावाने बँक ऑफ इंडियाच्या शाहूपुरी शाखेत आज खाते उघडण्यात आले आहे. खातेक्रमांक 090110110018730 असा असून IFSC CODE BKID0000901 असा असून पूरग्रस्तांच्या मदतीसाठी या खात्यामध्ये मदत जमा करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी केले आहे.

मदत व पुनर्वसन मंत्र्यांच्या उपस्थितीत अनुदान वाटप

मदत व पुनर्वसनमंत्री सुभाष देशमुख यांनी इचलकरंजी येथील स्नेहदीप हॉलमधील पूरग्रस्तांच्या शिबीराला आज भेट दिली. याठिकाणी रोख 5 हजार रुपये सानुग्रह अनुदानाचे वाटप श्री. देशमुख यांच्या उपस्थितीत ज्येष्ठ महिलेच्या हस्ते लाभार्थ्यांना करण्यात आले. यावेळी सांगलीतील हरिपूरप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील चंदुर हे गाव सोलापूर सोशल फाऊंडेशनच्यावतीने दत्तक घेत असल्याची घोषणा त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी आमदार सुरेश हाळवणकर, तहसीलदार सुधाकर भोसले आदी उपस्थित होते.
सांगली: ब्रह्मनाळवासियांच्या अडचणी मार्गी लावू, अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज दिली. पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ येथे बोट उलटून दुर्घटना घडली. या पार्श्वभूमिवर जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी आज ब्रह्मनाळ येथे प्रत्यक्ष भेट देवून ग्रामस्थांना धीर दिला.

यावेळी प्रशिक्षणार्थी आय. ए. एस. आशिष येरेकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे उपस्थित होते.

धोकादायक इमारतीत लोकांनी पुन्हा राहण्यास जावू नये, असे स्पष्ट करून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, 14 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीस स्वच्छतेसाठी निधी देण्यात आला आहे. घरांचे, शेतीच्या नुकसानीचे पंचनामे लवकरात लवकर करण्यात येतील.

डॉ. चौधरी यांनी ग्रामपंचायतीत ग्रामस्थांनी संवाद साधून त्यांच्या अडचणी ऐकून घेतल्या. सरपंच उत्तम बंडगर यांनी ग्रामस्थांच्या वतीने आवश्यक मदत व उपाययोजनांची माहिती दिली. खंडित वीजपुरवठा, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याचे नुकसान, रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण होण्याची गरज, विजेचे खांब बदलण्याची गरज, वॉटर ए. टी. एम यासह अन्य अडचणी ग्रामस्थांनी यावेळी मांडल्या. गावात अद्याप वीजयंत्रणा सुरू नसल्याचे कळल्यानंतर डॉ. चौधरी यांनी उद्या दुपारपर्यंत कोणत्याही परिस्थिती वीजपुरवठा सुरू करण्याच्या सूचना महावितरणला दिल्या.


डॉ. चौधरी यांनी बोट दुर्घटनेत मृतांचे कुटुंबीय रावसाहेब पाटील आणि आनंदा कारंडे यांच्या घरी भेट देऊन सांत्वन केले. तसेच, डॉ. अभिजीत चौधरी यांनी गावात विविध ठिकाणी भेट देऊन मदत कार्याची पाहणी केली. यावेळी ब्रह्मनाळ हायस्कूल येथे प्रशासनाकडून मदत मिळाल्याबद्दल ग्रामस्थांनी आभारपत्र दिले. यावेळी ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. जिल्हाधिकारी यांच्या ब्रह्मनाळ भेटीमुळे ग्रामस्थांच्या जखमेवर फुंकर घालली गेली असल्याची प्रतिक्रिया दिसत होती.

सोलापूरकरांच्या प्रेमामुळे मिळाला हरिपूरला आधार

महापुरात सांगलीचे अपरिमित नुकसान झाले. कृष्णा आणि वारणा नद्यांना आलेल्या पुरामुळे सांगलीसह जिल्ह्याच्या 4 तालुक्यात अपरिमित हानी झाली. या पार्श्वभूमिवर पूरबाधितांच्या दुःखावर फुंकर घालण्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी मदतीचे आवाहन केले. त्याला सोलापूरवासियांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

या पार्श्वभूमिवर हरिपूरचे सरपंच विकास हणबर यांनी पालकमंत्री सुभाष देशमुख यांचे आभार मानले. ते म्हणाले, आमच्या या गावाच्या अडचणीच्या काळात गाव दत्तक घेऊन व सोलापुरातून लोकांना या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मदत आली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज आमच्या गावात येऊन, स्वच्छता अभियानात हातभार लावत आहेत. यामुळे आज आम्हाला खूप मोठा आधार मिळाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
नगर -

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेली महाजनादेश यात्रा नगर जिल्ह्यात आठवडाभर उशिराने येणार आहे. 


पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार १८ व १९ ऑगस्टला नगर जिल्ह्यात येणारी ही यात्रा आता २४ व २५ ऑगस्टला येणार आहे. यामुळे जिल्हा भाजपला यानिमित्ताने करावयाच्या शक्तिप्रदर्शनाच्या नियोजनास अधिक वेळ मिळाला आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी १ ऑगस्टपासून राज्यात महाजनादेश यात्रा सुरू केली आहे. दीडशेवर विधानसभा मतदारसंघात यानिमित्ताने जाण्याचे त्यांचे नियोजन आहे. या यात्रेचा पहिला टप्पाही झाला आहे. पण नंतर कोल्हापूर व सांगलीतील भीषण पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली. 

यात्रेचा दुसरा टप्पा १७ ऑगस्टपासून सुरू होणार होता. त्यात १८ व १९ ऑगस्टला त्यांचा नगर जिल्हा दौरा होता. पण कोल्हापूर-सांगलीची पूरस्थितीमुळे यात्रेचा दुसरा टप्पा आठवडाभर पुढे ढकलण्यात आला आहे. आता २१ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट या काळात धुळे, जळगाव, नगर, बीड, औरंगाबाद, जालना, परभणी, नांदेड, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांतून ही यात्रा फिरणार आहे.


नगर -

सहकारी साखर कारखानदारीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या नावाने देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्कारांचे वितरण बुधवारी (१४ ऑगस्ट) सकाळी साडेदहा वाजता प्रवरानगर (लोणी) येथील डॉ. धनंजयराव गाडगीळ सभागृहात होणार आहे. 

अखिल भारतीय मराठी साहित्‍य संमेलनाच्‍या अध्‍यक्षा डॉ. अरुणा ढेरे यांच्‍या हस्‍ते साहित्‍य पुरस्‍कारांचे वितरण होणार असून, यानिमित्ताने येथे शेतकरी दिनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. केंद्रीय अन्नपुरवठा राज्‍यमंत्री रावसाहेब दानवे या वेळी उपस्थित राहणार आहेत.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांच्‍या जयंती दिनानिमित्त दरवर्षी साहित्‍य आणि कलागौरव पुरस्‍काराचे वितरण करण्‍यात येते. यंदाचे या पुरस्कारांचे २९ वे वर्ष आहे. यावर्षी ज्य़ेष्‍ठ साहित्‍यिक डॉ. नागनाथ कोतापल्‍ले यांना जीवनगौरव पुरस्कार दिला जाणार आहे. 

याशिवाय कोल्‍हापूर येथील किरण गुरव यांच्‍या 'जुगाड' कादंबरीला उत्‍कृष्ट साहित्‍य पुरस्कार, येवला येथील प्रा. गो. तु. पाटील यांच्‍या 'ओल अंतरीची' आत्‍मचरित्रास विशेष साहित्‍य पुरस्‍कार, संगमनेर येथील निलिमा क्षत्रिय यांच्‍या 'दिवस अल्‍लापल्‍लीचे' ललित लेखनास अहमदनगर जिल्‍हा उत्कृष्ट साहित्‍य पुरस्कार, कोपरगाव येथील शैलैश त्रिभुवन यांच्‍या 'मनातील शब्‍द' कविता संग्रहास जिल्‍हा विशेष साहित्‍य पुरस्‍कार, नाशिक येथील प्रा. डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांना समाजप्रबोधन व जालना येथील अभिनेते राजेंद्र तांगडे यांना नाट्यसेवा पुरस्‍कार या वेळी दिला जाणार आहे.

खासदार डॉ. सुजय विखे यांनी या पुरस्कार सोहळ्याचे नियोजन केले आहे. गृहनिर्माण मंत्री राधाकृष्‍ण विखे, माजी मंत्री अण्‍णासाहेब म्‍हस्‍के, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्‍थेचे महासंचालक डॉ.वाय.एस.पी थोरात, पुरस्‍कार निवड समितीचे अध्‍यक्ष डॉ.रावसाहेब कसबे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा शालिनी विखे, प्रवरा मेडीकल ट्रस्‍टचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी डॉ.राजेंद्र विखे, डॉ.विखे पाटील कारखान्‍याचे उपाध्यक्ष कैलास तांबे, प्रवरा बँकेचे अध्यक्ष बाळासाहेब भवर, बाजार समितीचे सभापती बापूसाहेब आहेर, ट्रक्‍स वाहतूक सोसायटीचे अध्यक्ष नंदू राठी यावेळी उपस्थित राहणार आहेत.


नगर- 

दोन गटात सुरू असलेली भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या दोन पोलिस कर्मचाऱ्यांना मारहाण करून एका पोलिस कर्मचाऱ्यावर तलवार हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे सोमवारी सायंकाळी ही घटना घडली. या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलिस स्टेशनला बारा जणांविरुद्ध खूनाचा प्रयत्न करणे, सरकारी कामात अडथळा आणणे, आर्म अॅक्टनुसार गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

  पोलिस कर्मचारी रवींद्र सुखदेव पवार, योगेश राऊत या दोघांना मारहाण झाली आहे. यात कर्मचारी पवार हा जखमी झाला आहे.


नगर -

गोदावरी व भीमा नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जिल्ह्यातील नदीकाठची ६४ गावे बाधीत झाली आहेत. संगमनेर, नेवासा, राहाता, श्रीरामपूर, कर्जत व श्रीगोंदा या तालुक्यातील गावांचा यामध्ये समावेश आहे.

पुरामुळे नगर जिल्ह्यात ५८ कोटी ८५ लाख रुपयांचे नुकसान झाले असून तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून राज्य सरकारला पाठविण्यात आला आहे.

अतिवृष्टी व त्यानंतरच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहेत. नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांमध्ये नदीकाठची ६४ गावे बाधित झाली आहेत. यांमध्ये ३ हजार ५४० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते.

यामध्ये कोपरगावमधील ६६३, श्रीरामपूर येथील १८६, नेवासा येथील १ हजार ३५० व राहाता तालुक्यातील १ हजार ३४१ जणांचा समावेश होता. चार मोठी जनावरे दगावली असून कोपरगावमध्ये एक जण वाहून गेला आहे. त्या घटनेत सरकारी पातळीवरून मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यामुळे राहुल द्विवेदी यांनी जिल्हा प्रशासनाला  पूर परिस्थिती संदर्भामध्ये दक्ष राहण्याचे आवाहन केले होते.

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget